Sunday, May 19, 2024
Homeनगरशिर्डी परिक्रमा महोत्सव स्थगित

शिर्डी परिक्रमा महोत्सव स्थगित

शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचा आदेश

शिर्डी (प्रतिनिधी) – आजपासून शिर्डी शहरात शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुढील आदेश होईपर्यंत सदरचा कार्यक्रम घेण्यात येऊ नये, असा आदेश शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी करुन संबंधितांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

ग्रामस्थ व ग्रीन एन क्लीन शिर्डी यांच्यावतीने साधुसंतांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या परिक्रमेत साधू-संतांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. यासाठी डॉ. जितेंद्र शेळके व इतरांनी शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 कार्यक्रम करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2020 च्या अर्जानुसार रविवार दि. 15 मार्च रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत महंत रामगिरी महाराज, महंत जंगलीदास महाराज, आमदार, खासदार, विविध पदाधिकारी, साईभक्त, नागरिक, विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत परिक्रमा मार्गावरुन 25 हजारापेक्षा जास्त साईभक्तांच्या उपस्थितीत परिक्रमाचे उद्घाटन करुन परिक्रमा नगर-मनमाड रोड, खंडोबा मंदिर येथून सुरुवात होऊन परिक्रमा मार्गाने जाऊन 4 नंबर गेट, द्वारकामाई येथे ही परिश्रम समाप्त होणार होती. त्यासाठी परवानगी मिळण्याबाबत विनंती अर्ज केला होता.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना काढण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये तसेच यापूर्वी अशी परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्या अनुषंगाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आरोग्याचे हित लक्षात घेता शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 हा कार्यक्रम स्थगित करण्यात यावा. अशा ठिकाणी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 (1) असा प्रतिबंधात्मक आदेश पारित करणे योग्य आहे. त्यानुसार शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 हा कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावा, असा आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या