Friday, November 15, 2024
Homeनगरतारांकित हॉटेलची खिडकी तोडून परदेशी भाविकाच्या अडीच लाखांची चोरी

तारांकित हॉटेलची खिडकी तोडून परदेशी भाविकाच्या अडीच लाखांची चोरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी शहरातील तारांकित हॉटेलच्या रुममधील एका परदेशी भाविकाचे खिडकी तोडून 2820 युरो परकीय चलन भारतीय मुद्रानुसार 2 लाख 25 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याची घटना घडली असून याबाबत शिर्डी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी हॉलंड येथील वीर महादेव सिंग खोसला यांनी आपल्या कुटुंबासह शिर्डीत येऊन शहरातील हॉटेल गोराडिया या तारांकित हॉटेलमध्ये दुसर्‍या मजल्यावर रूम नंबर 2003 बुक केली होती. शिर्डी पोलीस ठाण्यात वीर महादेव सिंग खोसला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझ्या कुटुंबासह दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी शिर्डी येथे आलो होतो. त्यावेळी आम्ही बुकिंग केलेल्या हॉटेल गोराडियामध्ये जाऊन आमचे सामान ठेवले.

- Advertisement -

साई दर्शनाचा ऑनलाईन पास काढला असल्याने आम्ही सर्व रुममधून दर्शनासाठी गेलो. दर्शन केल्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये आलो असता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये नाष्टा करताना एकास माझ्याजवळ असलेले परकीय चलन एक्सचेंज करायचे आहे असे म्हटले.तेव्हा त्याने याबाबत मी चौकशी करतो व आपणास सांगतो, असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत विजयकुमार नामक व्यक्ती होते. त्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर मी रात्री रूममध्ये अकरा वाजेपर्यंत संगणकावर काम करीत बसलो. त्यानंतर आंघोळ करून आम्ही सर्व साई दर्शनासाठी साई मंदिरात गेलो.

दि. 1 जानेवारीच्या पहाटे 4 वाजता रूममध्ये परतलो आणि झोपलो. सकाळी नऊ वाजता माझे जॅकेट व लॅपटॉप रूमच्या बाहेर मिळून आले. मात्र माझ्याकडे असलेले 2820 रुपये किमतीचे परकीय चलन तसेच इतर देशातील काही नाणी 1 युरोची किंमत 80 रुपये प्रमाणे 2 लाख 25 हजार रुपये अज्ञात चोरट्याने रूमची खिडकी तोडून चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हॉटेलच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून ही रक्कम चोरून नेली असल्याची फिर्याद भाविक खोसला यांनी शिर्डी पोलिसांत दाखल केली आहे. भाविकाने आपले चोरी गेलेल्या रकमेबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. फिर्यादी वीर महादेव सिंग खोसला यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुरनं 2/2020 नुसार भादंवि कलम 454, 451, 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या