Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील दुकाने आजपासून दिवसाआड होणार सुरू

श्रीरामपुरातील दुकाने आजपासून दिवसाआड होणार सुरू

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 51 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून श्रीरामपुरातील दुकाने शासकीय नियम पाळून सुरू होणार आहेत. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी तसा आदेशही जारी केला आहे. श्रीरामपूर शहारातील दुकाने सुरु करावी यासाठी व्यापार असोसिएशनने महसूल अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यापूर्वी आ. लहू कानडे, खा. सदाशिव लोखंडे यांनी व्यापारी व प्रशासकीय-अधिकार्‍यांच्या तीन-चार बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

काल दुपारी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे बोलणे करून दिल्यानंतर ना. थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांना आदेश देऊन नियमाचे पालन करून व्यावसाय सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकार्‍यांनी तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आदेश केल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी काल रात्री उशिरा हा आदेश जारी केला आहे.

- Advertisement -

शासनाकडून ठरवून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून आजपासून दुकाने सुरू होतील. त्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार गांधी पुतळा ते बेलापूर वेस पर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रीज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पश्चिम व दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने सुरू राहतील.

तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार गांधी पुतळा ते बेलापूर रोड वेस पर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रिज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत उत्तर दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पूर्व व उत्तर दिशेला तोंड असणारे दुकाने सुरू राहतील. रविवारी सर्व भागातील दुकाने बंद राहतील.

हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने मात्र बंद राहतील. प्रत्येकाने या अटी व शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तोंडावरती मास्क बांधलेला असेल तरच त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानांमध्ये एका वेळी फक्त पाच ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे.

दुकानाच्या प्रवेश द्वारावर शक्यतो ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, दुकानात प्रवेशावेळी सर्व ग्राहकांना हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा करण्यात यावी, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, शक्यतो 5 वर्षापर्यंत व 60 वर्षावरील व्यक्तींना दुकानात प्रवेश देण्याचे टाळावे, कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सर्व आस्थापना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवावे.

त्यामध्ये येणार्‍या ग्राहकांची संपूर्ण माहिती नमूद करणे बंधनकारक आहे, दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावे, अत्यावश्यक सेवा व शेतीविषयक बाबी दररोज सुरू राहतील, आस्थापना चालक, मालक, कर्मचारी, कामगार यांनी आरोग्य सेतू वापरणे बंधनकारक राहील, कोणत्याही दुकानदाराने तसेच ग्राहकाने आपले दुचाकी व चारचाकी वाहन दुकानापर्यंत न नेता बाहेर निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये पार्क करावे, दुकान मालकांनी ग्राहकांना शक्यतो ई-पेमेंट करण्याचा आग्रह धरावा.

सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. वरील नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. इतर बाबींसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध जसेच्या तसे लागू आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच वरीलप्रमाणे अटी व शर्तींचे पालन न करणार्‍या आस्थापना तात्काळ बंद करण्यात येऊन त्यांच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ही दुकाने राहणार बंद
हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने बंद राहणार आहेत.

लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती
दुकान चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून विविध प्रभागांमध्ये एक प्रमुख अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी काही अधिकार्‍यांची पथके तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकावर लक्ष ठेवले जाणार आहे. वरील नियम व अटींचे जो पालन करणार नाही, त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या