Friday, November 15, 2024
Homeनगरखोट्या सह्या करुन ‘व्हीप’ बजावल्याचा आरोप

खोट्या सह्या करुन ‘व्हीप’ बजावल्याचा आरोप

सभापती संगीता शिंदे यांचा शहर पोलिसांकडे तक्रार अर्ज

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या निवडीच्या वेळी खोट्या सह्या करुन सदस्यांना व्हीप बजविल्याचा आरोप करुन सभापती संगीता शिंदे यांनी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्याविरोधात शहर पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता सह्या आणि व्हीप खरा की खोटा हे ठरविण्याचा अधिकार आमचा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

सौ. शिंदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले की, दि. 7 जानेवारी 2020 रोजी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत सभापती पदावर माझी निवड झाली. सभापती व उपसभापती निवडीनंतर डॉ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अहमदनगर यांच्याकडे हरकत दाखल केली. वास्तविक काँग्रेस पक्षाच्या वतीने पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर माझी (संगिता शिंदे) पाच वर्षांसाठी कायदेशीर जिल्हाधिकारी यांचे समोर ओळख परेड करून गटनोंदणी करून गटनेते निवड केलेली असून अद्यापही मी कार्यरत आहे.

गटनेता या हक्काने मी सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी काँग्रेसच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता. परंतु डॉ. वंदना मुरकुटे यांनी खोट्या सह्या करुन व्हीप बजावला. त्यामुळे माझी व अधिकार्‍यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप या तक्रार अर्जात करून डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता ‘व्हीप’वरील सह्या खर्‍या की खोट्या हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य तो निर्णय घेवू, असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.

अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार
आम्ही संगीता शिंदे यांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे तसेच न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाच्या आकसापोटी, दबावतंत्राचा भाग म्हणून ते खोटीनाटी तक्रार दाखल करत आहेत. आम्ही याबाबत पक्षश्रेष्ठींकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा ठोकणार आहोत.
-डॉ. वंदनाताई मुरकुटे, पंचायत समिती सदस्या

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या