Wednesday, December 4, 2024
Homeशब्दगंधशब्दगंध : आत्मशांती : स्वीकारातून आत्मशांतीकडे

शब्दगंध : आत्मशांती : स्वीकारातून आत्मशांतीकडे

‘आत्मशांती’ मनाशी व विचारांशी निगडीत आहे. पण त्याचा मनासह शरीराशी संबंध आहे. शरीर, मन सुदृढ व आनंदी असेल तर आत्मशांतीचा अनुभव चांगला येऊ शकतो. शरीर आणि मनामध्ये परस्पररीत्या एक प्रकारचा सलोखा आणि लय असणे गरजेचे असते. या समन्वयाच्या स्थितीतूनच आत्मशांती निर्माण होऊ शकते. तसेच आपल्या विचारांमधील तात्विकता व भावनिकता याचा समतोल असणे पण गरजेचे असते. आपल्या भोवतालची परिस्थिती, व्यक्ती व त्यांचा स्वीकार यातूनच हा प्रवास सोपा होऊ शकतो.

पल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध, काही पटणार्‍या तर काही ‘न’ पटणार्‍या, काही आवडणार्‍या तर काही न आवडणार्‍या. या सगळ्या अनुभवातून जेव्हा मन स्थिर राहते त्या स्थितीला आपण ‘आत्मशांती’ म्हणू शकतो. ही स्थिती अचानक येत नाही, तो एक प्रवास आहे. आत्मशांती हेच जर का ध्येय मानले तर त्याकडे जाणार्‍या वाटा अनेक आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतात. एखाद्याला काम करताना आत्मशांतीचा मार्ग सापडतो, तर एखाद्याला तो निसर्गात, संगीतात, स्वत:मध्येच सापडू शकतो.

- Advertisement -

आपले पंचेंद्रियांमधून देखील आपण विविध अनुभव घेत असतो. हे अनुभव जेव्हा आनंदाकडे जातात, आपल्याला शांत अनुभवात नेतात. आपल्या स्वत:कडे बघायलाही पंचेंद्रिय मदत करू शकतात. यातून निर्माण होणार्‍या जाणिवा मन व शरीराला दिशा देऊ शकतात.
माझ्या कामांतर्गत मी अनेक लोकांना भेटत असतो. बर्‍याच वेळा ते त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे आलेले असतात. त्यांच्या परिस्थितीतील कोलाहल, मनातील द्वंद मला जाणवत असते. अशावेळेस त्यांचे समाधान मी करू शकलो तर तो क्षण मलाही समाधान देणारा ठरतो. हीसुद्धा एकप्रकारची त्यावेळेला मिळालेली आत्मशांती असते.

जेव्हा मी सायकलिंग, स्वीमिंग, रनिंग करतो; ते करणे मी आनंदाने स्वीकारलेले असते. धावताना मी पूर्णपणे त्या धावण्यात रमलेलो असतो. माझे धावणे मी आणखी कसे सुधारू शकतो किंवा पोहोतांना माझे टेक्निक किती योग्य होऊ शकते याकडे माझे लक्ष असते. सायकलिंग करताना तर माझ्यात आणि सायकलमध्ये एक नाते जडते. या सगळ्या क्रिया करताना ते करण्यात हरवतो. ते हरवणे म्हणजेच आत्मशांती आहे, असे मला वाटते.

स्वत:ला स्थीर ठेवण्यामध्ये आत्मचिंतन, ध्यानधारणा व व्हिजुलायझेशन याचा चांगला उपयोग करता येतो. आपल्यालाा जी परिस्थिती हवी आहे त्यामध्ये विश्वास ठेऊन तिच्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकणे यातसुद्धा मोठी ताकद असते. रोजच्या जीवनात आपण सातत्याने कशान कशाचा शोध घेत असतो. काही ना काही गाठण्यासाठी धावत असतो. कुठल्या न कुठल्या प्रकारचा संघर्ष करत असतो. यातून कधी मन थकते तर कधी शरीर. अशा वेळेसच खरे तर आत्मशांतीचा शोध सुरू होतो. विविध मार्गातून ती सापडते. ती कधी क्षणिक असते तर कधी दीर्घकाळ टिकणारी असते.

परंतु आत्मशांती लाभली म्हणजे आपल्या विवंचना थांबतील, असे नाही, तर पुढे सरकणार्‍या आयुष्यामध्ये त्या परतही येतील. सकारात्मक आणि जिद्दीने सामोरे जाणे व त्यातून एक शांत परिस्थिती निर्माण करणे हे आपल्याला सातत्याने करावे लागेल. विवंचना व सुखशांतीचा हा प्रवास अनादी काळापासून सुरू आहे. तो पुढेही चालेलच. या प्रवासाला कोण कसे सामोरे जातो हेदेखील प्रत्येक जण आपल्यासाठी ठरवू शकतो.

पोलीस दलामध्ये काम करताना एक फोर्सचा अधिकारी असतो. हे काम करताना मी ऐकण्याची कला शिकलो. त्यातून मला लोकांना समजून घ्यायला मदत झाली. त्यांची मते वेगळी असली तरी त्यांचा आदर करायला शिकलो. यातूनच सापडला तो कॉमन गोलकडे जाण्याचा मार्ग. या कॉमन गोलमध्ये परस्परांचा आदर, विविध मतप्रवाहांचा स्वीकार, परिस्थितीकडे पाहण्याची सकारात्मकता व स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याची भूमिका घेणे आवश्यक असते. हे करताना एक मार्ग निवडावा लागतो आणि त्यावर विश्वासाने आणि खंंबीरपणे उभे राहावे लागते. स्वत:मधील द्वंद, एकाच वेळेला येणारे अनेक विचार हे काही नीतिमूल्य डोळ्यासमोर ठेऊन हाताळावे लागतात.

मला या सगळ्या आत्मशांतीच्या प्रवासात नेहमी मदत होते ती स्वसंभाषणाची. आपण स्वत:शी बोलले पाहिजे, मनामध्ये येणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जेव्हा स्वत:शी संभाषण साधतो तेव्हा विविध पैलू तपासून बघतो. एकतर्फी विचारांपासून दूर जाऊन सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विचार करण्याची सवय लागते आणि यातूनच समाधान देणारे उत्तर मिळू शकते. एका अर्थाने हाच प्रवास महत्त्वाचा असतो.

आत्मशांतीच्या या प्रवासात इतरांबद्दलचे पूर्वग्रह, मतसुद्धा वेळोवेळी तपासावे लागतात. आपले कुटुंबीय, आप्तजन, मित्र परिवार आणि ज्यांच्या बरोबर काम करतो ते सहकारी या सर्वांचा स्वीकार ते आहे तसाच करावा लागतो. कधी त्यांना समजून घ्यावे लागते, कधी समजून सांगावे लागते. आत्मशांतीच्या या प्रवासात आपल्या भोवतालची माणसे महत्त्वाची ठरतात व त्यांचा स्वीकार आपण कसा करतो यावर आपली मानसिक स्थिती अवलंबून असते. या बाबतीत मला गालिबचा शेर आठवतो, किंबहुना या वाक्यांनी खूप मदत होते.

‘कुछ इस तरह मैने जिंदगी को आसान कर लिया,
किसी से मांग ली माफी, किसी को माफ कर दिया…’

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल,
विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या