अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील स्टेशन रोडवरील माणिकनगर या उच्चभ्रू वसाहतीत चोरांबरोबर झालेल्या झटापटीत न्यू आर्ट्स कॉलेजमधील प्राध्यापक जखमी झाले. प्रा. अनंत काळे असे त्यांचे नाव आहे. तीन चोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शहर पोलीस या हल्ल्याच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.
शहरासह उपनगरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. सावेडी, बुरूडगाव रोड, केडगाव भागातील उच्चभ्रू वसाहती चोरांनी टार्गेट गेल्या आहेत. त्यानुसार स्टेशन रोडवरील माणिकनगर या उच्चभ्रू वसाहतीत शनिवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घातला. वसाहतीमध्ये चोर घुसत असताना तेथील रखवालदाराने त्यांना हटकले. ते तिघे होते. रखवालदार विचारपूस करत असतानाच या चोरांनी त्याच्याबरोबर गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
थंडी असल्याने वसाहतीमधील रस्त्यांवर शांतता होती. हा सर्व प्रकार वसाहतीमधील प्रा. अनंत काळे यांच्या घरासमोर सुरू होता. हा गोंधळ त्यांनी ऐकल्याने ते बाहेर आले. रखवालदाराबरोबर हे चोर हुज्जत घालत असतानाच ते चोरांच्या मागे पळाले.
तिघा चोरांपैकी एकाला पकडण्यात प्रा. काळे यांना यश आले. परंतु या दोघांमध्ये चांगलीच धरपकड झाली. त्यात चोरांनी त्यांना धक्का दिला आणि पळ काढला. त्यावेळी चोरांच्या मागे प्रा. काळे पळाले. त्यावेळी ते रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. त्यांच्या दोन्ही हाताला मोठी जखम झाली आहे. या गोंधळामुळे वसाहतीमधील इतर लोक उठले. तो पर्यंत चोरांनी तेथून धुम ठोकली होती. यानंतर लोक पहाटेपर्यंत वसाहतीत जागेच होते.