Saturday, November 16, 2024
Homeनगरआंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा 10 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्याचा शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विविध संवर्गातील शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी, अथवा इच्छित जिल्ह्यात सेवा करण्यासाठी शिक्षक दुसर्‍या जिल्ह्यात जाऊ इच्छितात. त्यादृष्टीने गेले काही वर्षापासून ऑनलाईन स्वरूपात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने 19 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत बदली करू पाहणार्‍या शिक्षकांना स्वतःच्या लॉगीन वरून अर्ज सादर करता येणार आहेत. यावर्षी प्रथमच शिक्षकांना संकेतस्थळावरती अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- Advertisement -

बदली हवी असलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेतून दुसर्‍या जिल्हा परिषदेत जायचे आहे, त्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेची एकूण मान्य शिक्षकांच्या पदांपैकी 10 टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असू नये असेही सूचित केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी अर्ज सादर केला असेल मात्र त्यावर उचित कार्यवाही झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांना सर्व माहिती अचूक भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ग्रामविकास मंत्रालयाने यापूर्वीच प्रत्येक जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या बिंदूनामावली अंतिम करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी बिंदूनामावली आयुक्त कार्यालयातून अंतिम करून घेतली आहे. सध्याच्या जिल्हा परिषद संबंधित शिक्षकाचे नियुक्ती प्रवर्गातून करण्यात आलेली आहे. त्याच प्रवर्गातील दुसर्‍या जिल्ह्यात जागा असल्यास नियुक्ती देण्यात येणार आहे. राज्यातील आंतरजिल्हा बदली हा चौथा टप्पा सुरू आहे. यामुळे काही काळ जिल्हा परिषद नियुक्तीनंतर सेवा केल्यास दुसर्‍या जिल्ह्यात जाण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या