Monday, May 6, 2024
Homeनगरवृक्ष लागवडीची होणार तपासणी

वृक्ष लागवडीची होणार तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात 2017 पासून 3 वर्षात 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे निश्चित करून वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. वृक्षलागवड मोहिमेदरम्यान वनेतर क्षेत्रात लावलेल्या रोपांपैकी जिवंत रोपे आणि त्यांची वाढ तपासण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून 2017 पासून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीची शुक्रवारी बैठक झाली. यात, जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी लावलेल्या रोपांची सद्यस्थिती तपासली जाणार आहे. प्रत्येक वनेतर यंत्रणांच्या महिन्यातून किमान 2 रोपवनांची तपासणी करणे, दरमहा जिवंत रोपांच्या टक्केवारीचा आढावा घेणे, जिवंत रोपे 80 टक्केपेक्षा कमी राहणार नाहीत, यासाठी उपाययोजना करणे आदींचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सदस्य सचिव विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या