Sunday, September 15, 2024
Homeनगरवांबोरीला वेळेवर बस सोडत नसल्याने संताप; चक्क बसच्या टपावरच आंदोलन !

वांबोरीला वेळेवर बस सोडत नसल्याने संताप; चक्क बसच्या टपावरच आंदोलन !

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरहून तारकपूर आगाराची पिंपळगाव (ता. नगर) मार्गे वांबोरीला (ता. राहुरी) जाणारी व येणारी बस गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वेळेवर येत नसल्याने संतप्त झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी तारकपूर आगारात बुधवारी (दि. 1) बसच्या टपावर बसून आंदोलन केले. काही विद्यार्थिनी बसवर तर काही बसच्या मागे धावत असल्याने एकच गोंधळ उडाला. तारकपूर आगाराच्या या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

नगर तालुक्यातील कात्रड, मोरेवाडी, पिंपळगाव, राहुरी तालुक्यातील वांबोरी व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी नगर शहरात शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातून जाण्या-येण्यासाठी वाहतुकीची इतर साधने उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी बसने प्रवास करतात. तारकपूर आगारातून वांबोरीला जाणारी व येणारी बस कधीच वेळेवर जात-येत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात.

तारकपूर आगारातून सुटणार्‍या बसचे नियोजन गेल्या 15 ते 20 दिवसापासून बिघडल्याने ग्रामीण भागातून येणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. यावरून संतप्त झालेल्या 10 ते 15 महाविद्यालयीन विद्यार्थिंनी बुधवारी बसवर चढल्या, तर काही चालू बसच्या मागे पळत सुटल्या. यामुळे तारकपूर बसस्थानकात एकच गोंधळ उडाला. हा सर्व प्रकार पाहून आगाराचे मॅनेजर कल्हापूरे तेथे आले. संतप्त विद्यार्थिंनींनी मॅनेजर कल्हापूरे यांना धारेवर धरले. कल्हापूरे यांनी विद्यार्थिनींची समजूत काढत त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले.

बस कायमच उशीरा सुटते, बसमध्ये गर्दी असल्याने बसायला जागा शिल्लक नसते, उभे राहून जावे लागते, बसला उशीर झाल्याने पुढे वाडी-वस्तीवर जाण्यास अंधार पडतो, एखादी गंभीर घटना घडली तर याला जबाबदार कोण, असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार करत आगार प्रमुखांना विद्यार्थीनींनी धारेवर धरले. शेवटी प्रमुखांनी समजूत काढत सर्व विद्यार्थिंनींना एका बसमध्ये बसून दिले. परंतु, बस वेळेवर सुटण्याचे आश्वासन मिळालेच नाही. यामुळे तारकपूर आगाराचा ठिसाळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या