Sunday, September 8, 2024
Homeनगर‘एलसीबी’च्या कारभाराची अप्पर अधिक्षकांमार्फत चौकशी

‘एलसीबी’च्या कारभाराची अप्पर अधिक्षकांमार्फत चौकशी

आ. थोरात यांच्या मध्यस्थीनंतर खा. लंके यांचे उपोषण मागे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) अधिकारी व अंमलदारांविरूध्द खासदार निलेश लंके यांनी केलेल्या तक्रारीची नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षकांमार्फत 15 दिवसांत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर दिल्याने खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केलेले उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी खासदार लंके, माजी नगरसेवक योगीराज गाडे व अशोक रोहकले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

- Advertisement -

यावेळी गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कारभारविरोधातही लंके यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळाने तीन वेळा चर्चा केली. मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने उपोषणाबाबत तोडगा निघू शकला नव्हता. काल, गुरूवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात नगरमध्ये होते. त्यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, विक्रम राठोड, संदेश कार्ले आदींनी लक्ष वेधले. त्यानंतर थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निदर्शनास ही बाब आणली तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्यासमवेतही दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्ह्याबाहेरील अधिकार्‍यांमार्फत चौकशीस खासदार लंके यांनी संमती दर्शवल्यानंतर तसे पत्र कराळे यांनी ईमेलव्दारे पाठवले. त्यानंतर लंके व इतरांनी उपोषण मागे घेतले. आवश्यकता भासल्यास ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्याचेही महानिरीक्षक कराळे यांनी थोरात यांच्या सूचनेनुसार मान्य केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार लंके यांनी दूधदराच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर ते मागे घेतले होते. यासंदर्भात लंके म्हणाले, अनुदान वाटपातील अटी व शर्ती सरकारने शिथिल केल्या आहेत. मात्र दूधदरासाठी कायद्यात बदल करण्यास वेळ हवा, असे आश्वासन दिले होते. यादृष्टीने काही हालचाल होताना दिसत नाही. यासंदर्भात लवकरच मुंबईत आंदोलन केले जाईल, असे लंके यांनी यावेळी सांगितले.

खा. लंके यांचा मला अभिमान : आ. थोरात
खा. लंके यांनी केलेल्या चौकशीची मागणी मान्य करण्यात आली असून त्यासाठी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी पंधरा दिवसांत तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करतील. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारे खा. नीलेश लंके पहिलेच खासदार आहेत. नगर दक्षिणच्या मतदारांनी निवडलेल्या या लोकप्रतिनिधीचा मला अभिमान आहे. हा संघर्षयोध्दा आज जिंकला याचा आनंद असल्याचे आ. थोरात यावेळी म्हणाले.

तक्रारींचा पाठपुरावा करू : खा. लंके
उपोषण सुटल्यानंतर खा. लंके म्हणाले, उपोषण काळात नागरिकांनी आपल्याकडे जिल्हा पोलीस दलाच्या विरोधात दोन ते अडीच हजार तक्रारी दाखल केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचाही आपण पाठपुरावा करू,अन्यथा संसदेत आवाज उठवू, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या