Thursday, May 2, 2024
Homeनाशिकहनुमानवाडी जलकुंभातून पाण्याची गळती

हनुमानवाडी जलकुंभातून पाण्याची गळती

पंचवटी | वार्ताहर | Panchvati

मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी जलकुंभातून पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर ही गळती बंद करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे…

- Advertisement -

प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेल्या मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी जलकुंभाची पायाभरणी २००३ साली राज ठाकरे यांच्या हस्ते दशरथ पाटील महापौर असताना झाली होती.

मखमलाबाद रोडचा वाढता कॉलनी परिसर आणि त्यासाठी लागणारी पिण्याच्या पाण्याची कमतरता लक्षात घेऊन तत्कालीन नगरसेवक दिलीप खेडकर यांच्या वार्डात या जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती.

साडेतेरा लाख लिटर पिण्याच्या पाण्याची क्षमता असलेला जलकुंभ याठिकाणी उभारण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला. जलकुंभाची वयोमर्यादा जवळपास ३५ वर्ष असल्याचे सांगण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून या जलकुंभातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. हजारो लिटर पाणी वाया जाणे नागरिकांच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

पाणी गळतीमुळे एखादी दुर्घटनादेखील घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर मनपा प्रशासनाने लवकरात लवकर पाऊले उचलून पाण्याची गळती थांबवावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या