लेबनॉन | Lebanon
लेबनॉनमध्ये मंगळवारी पेजरमध्ये धमक्या दिल्यानंतर बुधवारी वॉकीटॉकी आणि सौर यंत्रणेत स्फोट झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी तीन हिजबुल्लाह सदस्य आणि एका मुलाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अनेक स्फोट झाले.
स्फोटाच्या या नव्या घटनांनंतर लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. लेबनीज सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बॉम्बस्फोट घडवून आणणारे वॉकीटॉकी हिज्बुल्लाने पेजरसह विकत घेतले होते. या स्फोटांसाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र इस्रायलकडून याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. ( Lebanon Pager Blast)
पेजरमध्ये झालेल्या स्फोटांबाबत असे सांगण्यात येत आहे की, पेजरमध्ये उत्पादनाच्या वेळी स्फोटके पेरण्यात आली होती. त्यामुळे पेजरमध्ये स्फोट झाले. हे स्फोट बेरूत, बेका व्हॅली आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाचे वर्चस्व असलेल्या दक्षिणेकडील लेबनॉनमध्ये झाले. हिजबुल्लाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण बेरूतमध्ये चार जणांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्फोट झाला.
दरम्यान, या हल्ल्यामुळे आता पश्चिम आशियात संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही पश्चिम आशियातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. लेबनॉनमधील घटनेबाबत शुक्रवारी संयुक्त राष्ट्रातही बैठक होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा