संगमनेर | Sangamner
कधी बिबट्याची, कधी थंडीची तर कधी महागाईची भीती. लोकांच्या मनात दिवसरात्र फक्त मरणाची भीती धास्तावत आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा कसं जगायचं? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. सध्या शेतकरी, ग्रामीण नागरिकांच्या मनात सारेच भीतीचे काहूर निर्माण झाले आहे. बिबट्याच्या भीतीने तर सध्या सहाच्या आत घरात अशी अवस्था झाली आहे. मात्र अनेकदा शेतीसाठीचा वीज पुरवठा रात्री होऊ लागल्याने शेतकर्यांना पाणी देण्यासाठी रात्रीच बाहेर पडावे लागत असल्याने त्यांच्या समोर कोणताच पर्याय उरलेला नाही.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील सिद्धेश कडलग या बालकावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. या घटनेमुळे भीतीमध्ये आणखी भर पडू लागली आहे. अकोले, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या बिबट्यांचा वावर सार्वत्रिक स्वरूपात दिसू लागला आहे. सूर्य मावळतीला गेला की शेतकरी आपले पशुधन गोठ्यात बांधतात आणि स्वतःला घरात कोंडून घेणे पसंत करू लागले आहेत. सध्या सूर्यास्त देखील लवकर होऊ लागल्याने त्याचा विपरित परिणाम जनजीवनावर होत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे पशुधन वाचवण्याचे आव्हान शेतकर्यांपुढे आहे. त्याचवेळी शेतात असलेल्या पिकांना पाणी द्यायचे झाल्यास दिवसा वीज नाही. अनेकदा असली तरी विविध कारणांनी झटके मारले जात आहेत. त्यामुळे शेतीसाठी शेतकरी रात्री उशिरा बाहेर पडत आहे. एकीकडे उभ्या राहणार्या पिकाला भाव नाही आणि ते पीक जगावे म्हणून रात्री बिबट्याच्या भीतीने बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांचे जगणे बिबट्याने हराम केले आहे. अनेक ठिकाणी सकाळी, रात्री दूध घालण्यासाठी शेतकर्यांना बाहेर पडावे लागते. सकाळी पडणार्या थंडीत कुडकुडत बाहेर पडणे आणि त्याचवेळी बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन सारे व्यवहार करावे लागत आहे. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत आहे.
आणखी किती बळी हवे ?
दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्या उसतोड सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या निवार्याची स्थळे संपुष्टात येऊ लागली आहे. त्यातच जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. मात्र आता केवळ त्यांचे दर्शन होत आहे असे नाही तर काल परवापर्यंत पशुधनावर होणारे हल्ले आता मनुष्यावर होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याने मानवी जीवांवर हल्ले करत अनेकांचे प्राण घेतले आहे. त्यामुळे वन विभागाला आणखी किती बळी हवे आहेत? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.
एसटी बस फेर्या सुरू करा..
कोरोनापूर्वी अढळा परिसरातील समशेरपूर, केळीपर्यंत जाणार्या बसेस मोठ्या प्रमाणावर होत्या. रात्री साडेआठ नंतरही वीरगावपर्यंत बस मिळत होती. सकाळी सहाला संगमनेरकडे येण्यासाठी बस उपलब्ध होती. मात्र त्यानंतर या मार्गावरील बसेसची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे भीतीदायक झाले आहे. त्यामुळे या मार्गावर उशिरापर्यंत जाणार्या येणार्या बसेस सुरू करा अशी मागणी पालकांच्यावतीने करण्यात येऊ लागली आहे. बसेस उपलब्ध नसल्याने मुलींच्या शिक्षणाकडे पालकांचा कानाडोळा होऊ लागल्याची खंतही व्यक्त होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असून सुमारे तीस-चाळीस गावांच्या नागरिकांचा प्रवास होत असल्याने बिबट्याच्या भीतीने प्रवासी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




