संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील जवळे कडलग येथे शनिवारी (दि.13) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून, जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चारवर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. हिच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली. त्यात तो ठार झाला. त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला. यापूर्वी देखील बिबट्याने येथूनच दोन मांजरांची शिकार केली होती.
या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपविभागीय वनाधिकारी अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मात्र, संतप्त झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
वन विभागाला धरले धारेवर…
जवळे कडलग येथे बिबट्यांचा उपद्रव सुरू आहे. याबाबत वन विभागाला वारंवार सांगूनही कोणत्याही उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकार्यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले. पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करुनही तो न लावल्याने चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आम्हांला भरपाई देवून सांत्वन करु नका तर आमचा मुलगा आम्हांला परत द्या, अशी मयत सिद्धेशची आजी टाहो फोडून सांगत होती.




