Thursday, May 2, 2024
Homeनगरशेतीला पाणी देत असताना शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला..

शेतीला पाणी देत असताना शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला..

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे काल रात्री 12 नंतर शेतीला पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला चढवला. दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. जीव गेल्यावर वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोनेवाडी परिसरात पाळणा लावणार का? असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे सोमवारी रात्री आपल्या शेतामध्ये भिकाजी बोडखंळ व दिनकर बोंडखळ शेतीला पाणी भरत होते. व्यंकट बोंडखळ आपल्या शेताच्या बाजूला कुत्रे भुंकतात म्हणून जागे झाले असता त्यांना समोर बिबट्या शेतात पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर चाल करून जात असताना दिसला त्यांनी मोठ्याने आवाज देत बोंडखळ यांना सावध केले. मोठी डरकाळी फोडत बिबट्या अंगावर झेप घेण्याच्या स्थितीत असतानाच आपल्या जवळच्या बॅटरी चालू करत बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्या त्यामुळे बिबट्या तिथेच थबकला. व्यंकट बोंडखळ यांनी सावध पवित्रा घेत सयराम बोंडखळ, भाऊसाहेब बोंडखळ, नितीन रांधवण, भास्कर होन त्यांना आवाज देत बोलावून घेतले. सयराम बोंडखळ यांचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी चालू करत बिबट्याच्या दिशेने फिरवला मग मात्र बिबट्याने तिथून पळ काढला. ही माहिती बोंडखळ यांनी पोलीस पाटील दगु गुडघे, सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, ग्राम विकास अधिकारी विजय जोर्वेकर यांना दिली.

पोलीस पाटील दगु गुडघे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मागच्या आठवड्यात देखील बोंडखळ यांचा बोकड याच बिबट्याने ठार केला होता. तेव्हाही वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून पिंजरा लावला जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सोनेवाडी चांदेकसारे पोहेगाव परिसरात हा एकमेव बिबट्या दहशत पसरत असून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी जाणे जिकरीचे झाले आहे.

या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न उपस्थित करत एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावर वन विभाग परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणार का? असा प्रश्न भिकाजी बोंडखळ व दिनकर बोंडखळ यांनी उपस्थित केला. या परिसरात त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या