Sunday, September 15, 2024
Homeनाशिककोडीपाडा येथील युवकावर बिबट्याचा हल्ला

कोडीपाडा येथील युवकावर बिबट्याचा हल्ला

ठाणगाव | वार्ताहर | Thangaon

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा (Leopard) धुमाकूळ सुरूच असून सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव शिवारातील कोडीपाडा राक्षसभुवन रोडवर बिबट्याने एका युवकावर हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. प्रल्हाद हंसराज महाले (१६, रा. कोडीपाडा) असे या जखमी युवकाचे नाव आहे.

प्रल्हाद महाले हा ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत आहे. प्रल्हाद महाले शेतात गेला होता. तो रात्री आठला घरी परतत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालत गुडघ्याच्या खाली पंजा मारून जखमी केले.

त्याच्यावर बाऱ्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बोरसे यांनी प्राथमिक उपचार केले. सोमवारी सकाळी बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल माया म्हस्के, वनरक्षक सुशीला लोहार यांनी जिल्हा रुग्णालयात प्रल्हाद यास उपचारासाठी दाखल केले. बाऱ्हे परिसरातील जंगलात दिवसेंदिवस बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या