करंजी खुर्द | प्रतिनिधी karanjiKhurd
निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील करंजगाव व चापडगाव येथील शेरे मळ्यात निलेश पुंजाराम देवकर यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना देवकर यांच्या द्राक्ष बागेत बिबट्याचा बछडा आढळून आला. करंजगाव येथील शेतकरी निलेश देवकर यांची गोदावरी नदीलगत द्राक्ष बाग व इतर शेती आहे.
बुधवार दि. १७ रोजी देवकर यांच्या गट नंबर २७६ मध्ये कांदे लागणीचे काम सुरू असताना दुपारी सुमारे १२ वाजता द्राक्ष बागेतून गुरगुरण्याचा आवाज आला. आवाज ऐकून कांदे लागण करणाऱ्या कोकणी शेतमजुरांनी बागेत धाव घेतली असता अंदाजे सहा ते सात महिन्यांचा बिबट्याचा बछडा आढळून आला. मजुरांनी बछड्याचे चारही पाय आधी कपड्याच्या साहाय्याने व नंतर जाड साखळीने द्राक्ष बागेतील लोखंडी अँगलला बांधून ठेवले.
यानंतर देवकर यांनी येवला परिक्षेत्रातील निफाड वनविभागाचे वनरक्षक विजय दोंदे यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याच्या बछड्याला जेरबंद केले. नागरिकांच्या मते बिबट्याची मादी जवळच असल्याने खबरदारी म्हणून बछड्याला त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.




