Monday, July 22, 2024
Homeनगरबिबट्यापासून बचावासाठी वनखात्याची मोहीम

बिबट्यापासून बचावासाठी वनखात्याची मोहीम

वीरगाव |वार्ताहर| Virgav

- Advertisement -

अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिक आणि खास करून शाळेतील लहान विद्यार्थ्यांना बिबट्यापासून स्वसंरक्षण करण्याबाबत वनविभागाने मोहीम सुरू केली असून देवठाण वन परिमंडळाचे वनपाल पंकज देवरे यांनी वीरगावच्या जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वीरगावच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते.

मार्जार कुळातील बिबट्याची माहिती आणि घ्यावयाची काळजी याबद्दल बोलताना पंकज देवरे म्हणाले, उशिरा पडलेल्या पावसामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटले त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा वावर गावा-शिवारात वाढला.ऊसशेती आणि इतर पिकांमुळे बिबट्यांना अधिवासासाठी पोषक वातावरण तयार झाले. बिबट्या हा आळशी प्राणी असून शेतातील घुशी, रानडुकरे, मांजर आणि छोट्या पशुधनावर हल्ला करतो. त्याच्या भक्ष्याच्या आड येणारावरच तो हल्ला करतो. अन्यथा बिबट्या हा भित्रा प्राणी असून स्वतःच्या बचावासाठी क्वचित तो माणसावर हल्ला करू शकतो. त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर मात्र तो भक्ष्य म्हणून हल्ला करू शकतो.

खासकरून लहान विद्यार्थ्यांनी याबाबत जागरुकता बाळगायला हवी. शाळेत येताना आणि जाताना समुहाने जावे. रस्त्याने गप्पा करीत चालावे. सुर्यास्तानंतर घराच्या अंगणात येण्याचे टाळावे.अंगणात वाकून काम करताना दक्षता बाळगावी.घरातील पाळीव कुत्रा, मांजर या प्राण्यांबरोबर घराबाहेर खेळू नये. पालकांनीही रात्रीच्या वेळी मुलांना अंगणात एकटे सोडू नये. घराभोवतीचे विजेचे दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवावेत.

पशुधनावर हल्ला होऊ नये म्हणून पाळीव प्राण्यांचे गोठे बंदिस्त असावेत. शेतात वाकून काम करताना शेतकर्‍यांनी दक्षता बाळगावी. बिबट्या समोर दिसल्यास आरडाओरडा करावा. बिबट्याचा पाठलाग करू नये अन्यथा तो प्रतिहल्ला करण्याची शक्यता असते. पशुधन किंवा मानवी हल्ला झाल्यास तात्काळ वनविभागाला कळविण्याचे आवाहनही शेवटी वनपाल पंकज देवरे यांनी केले.

यावेळी विद्यार्थी आणि उपस्थित ग्रामस्थांनी विचारलेल्या शंकांचे निरसन पंकज देवरे यांनी केले. यावेळी जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे आणि भाऊसाहेब चासकर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुमकर, ज्ञानेश्वर खुळे, अण्णासाहेब थोरात, बाबासाहेब वाकचौरे, वनकर्मचारी सुनिल गोसावी, बाळासाहेब थोरात, गौतम जगधने, संजय घोडेकर, मुख्याध्यापक शैलजा भोईर, भाऊसाहेब चासकर, रामनाथ वाकचौरे, रावसाहेब सरोदे, संभाजी वैद्य, बाळशिराम आरोटे, भास्कर आंबरे, श्रीराम धराडे,अनिता भालेराव, मीना गोडसे हे सर्व शिक्षक उपस्थित होते.

मोरांची शिकार वाढली

वीरगाव शिवारात मोरांची संख्याही वाढलेली आहे. संध्याकाळच्या वेळी या मोरांवर पाळत ठेवून रात्री त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या डोळ्यांवर वीजेरीने तीव्र प्रकाश टाकला जातो.डोळ्यांवर अंधारी आल्याने भुलीसारखी अवस्था होऊन मोर झाडावरुन खाली पडतात.मोरांच्या शिकारीचे प्रमाणही वीरगाव शिवारात वाढले असून त्याचाही बंदोबस्त करण्याचे आश्वासन वनपाल पंकज देवरे यांनी दिले.

एकाच दिवशी गाव-शिवारात अनेक ठिकाणी बिबट्या दिसतो. त्यामुळे अनेक बिबटे असण्याची शंका व्यक्त होते. प्रत्यक्षात बिबट्याचा रोजचा प्रवास 12 ते 15 किलोमीटरचा असतो. त्यामुळे एकाच बिबट्याचे अनेक ठिकाणी दर्शन झाल्यास ही शंका वाढते. घुशी, रानडुकरे या पिकांचा नाश करणार्‍या प्राण्यांना तो खात असल्याने एकप्रकारे शेतकर्‍यांचा तो मित्रच आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी लहान मुलांना सावधानता बाळगण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे. बिबट्या हा तसा आळशी आणि भित्रा प्राणी असून तो स्वतःहून हल्ला करण्याची शक्यता फारच कमी असते.बिबट्याबाबत कुणीही कृपया अफवा पसरवू नये. सावधानता मात्र सर्वांनीच बाळगायला हवी.

– पंकज देवरे, वनपाल, देवठाण वनपरिमंडळ

- Advertisment -

ताज्या बातम्या