राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
काल मध्यरात्रीच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकला. मात्र, या बिबट्याला बाहेर असलेल्या अन्य तीन बिबट्यांनी पिंजर्याच्या दरवाजाला धडका देत लॉक वाकवून त्याची सुटका केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात घडली. या प्रकाराने वन विभागाची झोप उडाली आहे. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेतली.
राहुरी तालुक्यातील वडनेर येथील एका शेतकर्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून शेतकर्याला ठार केले होते. वडनेरच्या शेजारीच असलेल्या कुरणवाडी शिवारात देखील चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातील एक बिबट्या काल मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात अडकल्यामुळे शेतकर्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. परंतु, अडकलेल्या बिबट्याच्या पिंजर्याबाहेर आणखी तीन-चार बिबटे घिरट्या घालत असल्याचे शेतकर्याच्या निदर्शनास आल्यानंतर दुसरे बिबटे पकडण्यासाठी तात्काळ या ठिकाणी आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी केली. तरच हा पकडलेला बिबट्या हलवावा अशी भूमिका ग्रामस्थांनी केल्याने ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचार्यांमध्ये वाद झाला. मात्र काही वेळातच पकडलेल्या बिबट्या शेजारी पिंजर्याबाहेर पुन्हा तीन बिबटे आले आणि त्यांनी पिंजर्याच्या दरवाज्याला धडका देत पिंजर्याचा लॉक वाकून अडकलेला बिबट्याची सुटका करून घेतली.
पकडलेला बिबट्या पुन्हा पिंजर्यातून निसटल्याने वन विभागाची देखील चांगलीच भंबेरी उडाली. सदर ठिकाणी लावलेल्या पिंजर्याचे लॉक व्यवस्थित नसल्यानेच बिबट्या पिंजर्यातून निसटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आण्णासाहेब खिलारी, बाळासाहेब खिलारी, काशिनाथ ढवाण, डॉ.ज्ञानेश्वर आघाव, सुनिल खिलारी, राजेंद्र खिलारी, दिपक खिलारी, रामा खिलारी, पोपट खिलारी, पोलीस पाटील शिवाजी केदारी आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे, वनपाल सचिन शहाणे, गणेश गिर्हे, वनरक्षक समाधान चव्हाण, शंकर खेमनर, संतोष साळवे, मदन गाडेकर, सागर वाकचौरे, ताराचंद गायकवाड आदिंनी धाव घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत.