नाशिक |प्रतिनिधी Nashik
महसूल विभागाबाबत जे पत्र नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (nashik police commissioner deepak pandey) लिहिले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह भाषेत आहे. या पत्राची दखल घ्यावी की नाही, असे वाटते परंतु महराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस आयुक्तांबाबतची नाराजी आपण व्यक्त करणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महसूलमंत्री थोरात आज माध्यमांशी बोलत होते…. ते म्हणाले की, मीडियाकडे आयुक्तांनी जाण्यापेक्षा चुकीच्या बाबी ज्या त्यांच्या निदर्शनास आल्या असतील त्या त्यांनी तेव्हाच महसूल विभागाच्या निदर्शनास आणून द्यायला हव्या होत्या. राज्यात कायद्याचे राज्य आहे. असे असताना एखादा वरिष्ठ पदावरील व्यक्ती जेव्हा असे वक्तव्य करतो ते खूप दुर्दैवी आहे.
आयुक्तांचे पत्र अद्याप आपण वाचलेले नसून अधिक याबाबतची माहिती नाही. परंतु मिडीयाने सांगितल्यानुसार, या पत्राची भाषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. मीडियासमोर असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. कुणी चुकीचे असेल तर त्यांची तक्रार करावी निश्चित चौकशी केली जाईल. सर्वांनाच याबाबत दोष देणे अत्यंत चुकीचे असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.