दिल्ली । Delhi
लोकसभा निवडणुकीचे २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. ज्यामध्ये एनडीएला २९३ आणि इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या तर इतरांना १६ जागांवर विजय मिळाला. यात अनेक जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. तेथे आता अनेक नवे चेहरे दिसत आहेत.
दरम्यान १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी नियोजित आहे. शपथविधीनंतर हे खासदार अधिकृतपणे लोकसभेचे सभासद होतील. त्यात अनेक खासदार असे आहेत, जे पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेणार आहेत.
सभागृहातील तब्बल ५२ टक्के म्हणजेच २८० खासदार पहिल्यांदाच खासदार म्हणून शपथ घेणार आहे. खासदार होताच सोयीसुविधा मिळू लागतील आणि ते सामान्य लोकांमध्ये खास असतील. या खासदारांना कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत, याची माहिती पुढील प्रमाणे.
पगार आणि भत्ते
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सदस्यांना साधारणपणे पगार, प्रवास सुविधा, वैद्यकीय सुविधा, निवास, दूरध्वनी, पेन्शन आदींसह अनेक भत्ते दिले जातात. ११ मे २०२२ च्या पगार आणि भत्त्यांमध्ये केलेल्या बदलांनुसार, खासदारांना १ लाख रुपये पगार दिला जातो, त्याशिवाय त्यांना घरातील सभांसाठी भत्ता म्हणून दररोज २००० रुपये मिळतात.
प्रवासाची सुविधा
खासदारांना सभागृहाचे अधिवेशन, समितीच्या बैठका आदींना उपस्थित राहण्यासाठी प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यासाठी खासदारांना अधिवेशनात येण्या-जाण्याचे पैसे दिले जातात. जर एखादा खासदार १५ दिवसांपेक्षा कमी दिवस अधिवेशनाला गैरहजर राहिला तर त्याला प्रवासाचे पैसे मिळतात. काही प्रवासासाठी खासदारांना रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यात मोफत प्रवास मिळतो.
हे देखील वाचा : धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट
कुटुंबातील सदस्यांनाही काही प्रवासात सूट
त्याचबरोबर कुटुंबाबाबतही काही नियम आहेत. यामध्ये कुटुंबातील सदस्यांनाही काही प्रवासात सूट मिळते. त्याचबरोबर अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीपच्या खासदारांना स्टीमरची सुविधा देण्यात आली आहे. प्रवासाबाबत सूट देण्यासाठी अनेक अटी आहेत, त्यानुसार खासदारांना सूट मिळते. यासोबतच प्रत्येक खासदाराला त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी पैसेही मिळतात.
स्टेशनरी, पत्र आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसे
अधिकृत वेबसाइटनुसार, प्रत्येक खासदाराला २०,००० रुपये, स्टेशनरीसाठी ४,००० रुपये, पत्रांसाठी २,००० रुपये आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसे दिले जातात.
टोलमध्ये सूट
टोलमध्ये सूट देण्यासाठी, प्रत्येक खासदाराला दोन फास्टॅग दिले जातात, एक दिल्लीतील वाहनासाठी आणि एक त्याच्या क्षेत्रातील वाहनासाठी. याद्वारे ते टोलशिवाय प्रवास करू शकतात. तसेच खासदारांना अनेक ठिकाणी प्रवेश किंवा प्रोटोकॉल मिळतात जिथून सामान्य माणसाला दूर ठेवले जाते.
हे देखील वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?
वैद्यकीय सुविधा
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत (सीजीएचएस) खासदार आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. त्यात सरकारी रुग्णालयांतील, तसेच या योजनेखाली येणाऱ्या निवडक खासगी रुग्णालयांतील उपचारांचा समावेश आहे.
घर आणि निवास
खासदारांना त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीतील उच्चभ्रू भागात बिगर भाड्याचे निवासस्थान दिले जाते. त्यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना बंगला, सदनिका वा वसतिगृहातील खोली असे दिले जाते. जे अधिकृत निवासस्थान घेत नाहीत, त्यांना दर महिन्यास निवास खर्च म्हणून २ लाख रुपयांच्या भत्त्यावर दावा सांगता येतो.
दूरध्वनी आणि इंटरनेट
खासदारांना वर्षाला दीड लाख मोफत कॉल दिले जातात. याशिवाय त्यांच्या घरी आणि कार्यालयांत मोफत वेगवान इंटरनेट जोडणी दिली जाते.
पाणी आणि वीज
खासदारांना दर वर्षाला ५० हजार युनिट मोफत वीज, तसेच ४ हजार लिटर पाणी मोफत पुरवले जाते.
वेगवेगळ्या सुविधा
मतदारसंघ भत्ता म्हणून सुमारे ७० हजार रुपये, कार्यालयीन खर्च आणि दैनंदिन भत्ता म्हणून सुमारे ६० हजार रुपये मिळतात.
खासदाराचे नेमके काम काय?
- खासदारांचे प्राथमिक काम हे संविधानानुसार कायदे बनवणे आणि त्यात सुधारणा करणे हे आहे.
- सरकारी धोरणे आणि कृतींचे पुनरावलोकन आणि टीका करणे.
- आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या संसदेत मांडणे.
- राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला सल्ला देणे.
- आंतरराष्ट्रीय परिषद आणि बैठकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे.