Wednesday, December 4, 2024
Homeनगरधक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट

धक्कादायक! कृषी विभागाचे बियाणे उगवलंच नाही; शेतकऱ्यांवर कोसळले संकट

पिंपरी निर्मळ । वार्ताहर

राज्य सरकारने प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे पुरवले मात्र पेरणीनंतर आठ उलटून गेले तरीही हे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने तातडीने या गंभीर बाबीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा उपोषणाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

राज्य सरकार शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान मदत व्हावी या हेतूने ५० टक्के सवलतीने विविध प्रकारचे बियाणे पुरवते. पिंपरी निर्मळ येथील शेतकरी बचत गटांना व वैयक्तिक अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बियाणे पुरवठा करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी महाबीज फुले किमया या जातीचे बियाणे पेरणी केले. आठ दिवस उलटून गेले तरीही या बियाण्याची अद्याप उगवण झालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

शेती मशागत, पेरणी, बियाणे, खते, ट्रॅक्टरची मजुरी असा मोठा खर्च शेतकऱ्यांचा यासाठी झालेला आहे. बियाणे बोगस आहे का? बियाणाची उगम क्षमता कमी आहे का? बियाणे भिजलेले होते का? या निमित्ताने असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शासनाच्या व बीज कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाने व संबंधित विभागाने तातडीने या बाबीची दखल घेऊन या गंभीर बाबीची चौकशी करावी तसेच या आपतग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दुबार पेरणीसाठी आवश्यक ते बियाणे, खते व इतर यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी दीपक घोरपडे, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे आदींनी केली आहे. तसेच कृषी विभागाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांचे शास्त्रज्ञ देशमुख, कृषी सहाय्यक जया निमसे, श्रीमती माघाडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी या प्लॉटची पाहणी केली असून सोमवार पर्यंत यावर योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले.

ज्या प्लॉटवर शासनाचे प्रकल्प अभियान अंतर्गत अनुदानित बियाणे उगवले नाही त्याच शेजारील प्लॉटवर शेतकऱ्याने दूसरे बियाणे त्याच दिवर्शी त्याच ट्रॅक्टरने पेरले होते. त्या बियाण्याची मात्र अत्यंत उत्कृष्ट उगवण झालेली दिसते. त्यामुळे हे बियाणे सदोष आहे आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या