Friday, May 3, 2024
HomeUncategorized‘जीवन हे कधी न संपणारा प्रवास’

‘जीवन हे कधी न संपणारा प्रवास’

बाळासाहेब पाटील – ९४२३१९०४५७

पारोळा – Parola

- Advertisement -

पारोळा तालुक्याची वाटचाल ही संघर्षमय असून त्या संघर्षाला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावाच लागतो, तेव्हा तेथे राजकारण म्हणा की समाजकारण किंवा घरसंसार अशा या संघर्षाला राजकारणी व समाजाचे धुरंधर मंडळी सामोरे जातच असते पण घर संसाराच्या वाटा बिकट झाल्याने तेथेच संघर्षाला वेगळं वळण लागत त्याचं गोंडस नाव ‘व्यसन’.

जीवनाचा हा खडतर प्रवास कधी न संपणारा असून देखील या तालुक्यात व्यसनामुळे बर्‍याच आत्महत्या अन् अपघात झाल्याने कमी वयात मुली व सुना ह्या विधवा झाल्याचे चित्र या तालुक्याला उघड्या डोळ्यानं पाहावं लागतं हे आमचं पूर्वजन्मीचं पाप असं म्हटलं जातं, पण पाप-पुण्यांचा हिशो आपण लावतांना व्यसनपासून आपलं घर मुक्त कसं होईल याचा विचार कुणीच करत नाही.

बाप जर मुलाला बिडी-सिगारेटचं पाकिट अन् दारूची बाटली आणायला भाग पाडत असेल तर यात मुलाला गोडी लागली तर दोष कुणाचा? देवाचा की, पाप-पुण्याचा.

तालुक्यात सुसाट वेगानं दुचाकी चालवतं एकाचवेळी तीन-चार जणांचा रस्त्यावरच खात्मा होत असेल तर तो दोष वाहनातील पेट्रोलचा नसून त्यांच्या पोटात असलेल्या त्या ‘तिचा’ असतो याचा विचार कुणीच करायला तयार नाही.

जीवनाच्या या खडतर प्रवासात या व्यसनामुळे घरगुती भांडणातून देखील विहिरीतून उडी, विष प्राशन, दोराचा फास आवळणे अशा प्रकारच्या घटनांनी उद्रेक केला आहे. व्यसनांमुळे वाट चुकलेल्या माणसाला स्मशानाची वाट धरावी लागणार नाही यासाठी ग्रामस्थांनी एकोप्यानं अशा व्यसनींना समज घालावी, महिलांनी यात पुढाकार घ्यावा, संघर्षमय जीवनाची वाट शिकायला मिळावी अशा वाईट घटना घडू नयेत अशी परिस्थिती गावागावातून निर्माण झाल्यास व्यसनापासून सुटका होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकेल ना? संघर्षमय जीवन जगत वेडा झाला पण व्यसनाकडे अन् आत्महत्येकडे वळला नाही असं एक जीवंत उदाहरण ‘म्या डोळ्यानं पाहिलं’ ते असं…

एका कार्यक्रमाला शिरपूरकडे दभाषीला जात असतांना धुळे जिल्ह्यातील नरडाण्याच्या कुशीत महामार्गाच्या पुलाखाली विसावलेला विधुर अन् पोरका माणसाला पाहून वाहन थांबवत त्याच्याजवळ गेला तर ज्याला जीवनात संघर्ष कसा करावा असं शिकविणारा व स्वाभिमानी कसं असावं हे तेथे पाहायला ऐकायला अन् त्यातून मन सुन्न करणारी घटना पाहून काय असेल या व्यक्तीच्या जीवनपटावरील कहाणी ऐकण्यासाठी नाव विचारण्यापासून सुरवात केली उत्तर मिळाले माझ्या नावात नावासारखं कांहीच उरलं नाही मीच माझ्या नावाचा धनी, थोडा वेडसरपणा पण जुन्या आठवणींना उजाळा देतांना सारं शरीर क्षीण झालेलं असतांना म्हणाला या गावाजवळ माझी हॉटेल होती.

गुजरातचा राहणारा, हॉटेलचा व्यवसाय चांगला चालायचा, पत्नी आजारात गेली, मुलबाळं नव्हती, कुणासाठी करायचं असं म्हणत व्यसनाकडे न वळतां हा पूल ही जागा माझं सर्व कांही म्हणत रडू लागला. वयाची पन्नाशी उलटलेला सार्‍या बाबींचा त्याग करून जीवन जगतांना कुणाकडे आजतागायत या माणसाने काहीच मागितले नसल्याचे तेथे असलेल्या रसवंती व कोल्ड्रींगच्या दुकानदारांनी सांगितले.

जे कोणी खायला देईल तेच घेतो, पैसे घेत नाही, अशा या संघर्षमय जीवनाकडे पाहून ऊन, वारा, पाऊस, थंडीचा सामना करीत कुणासाठी जगत असेल नक्कीच पाहणार्‍या प्रत्येकाला वाटत असेल ना? पण ज्यांना घरदार, सुख संपत्ती, बायको पोरं असलेल्या सुखी माणसानं सुखी जीवनाचा त्याग करावा ही बाब सुखी कुटुंबाला दु:खात लोटून जाण्यासारखीच आहे ना, पण लक्षात कोण घेतो, पहिल्या दिवसापासून उत्तर कार्यापर्यंत रडा-रड असते नंतर हळू-हळू त्याच्या जाण्याचा विसर पडतही असेल पण दारूने घात केल्याचा विसर पडत नाही मग हीच गावा-गावातून नाहीशी व्हावी असे प्रयत्न कां केले जात नाही.

हीच एक शोकांतिका असून जीवनाला मागे-पुढे काहीच अर्थ उरलेला नाही असं कळत असतांना सुध्दा नरडाण्याच्या पुलाखाली विसावलेल्या व जीवनाशी संघर्ष करीत जीवन जगणार्‍या त्या माणसाकडे पाहिल्यावर असं वाटतं की कांहीच शिल्लक नसलेल्या या माणसानं कां जीवन जगावं, आत्महत्या का करून घेऊ नये, पण नाही तोच नशेला असतां तर त्याने कधीच आत्महत्या केली असती कारण तो ‘आहारी’ गेलेला नसून दिलेलं जीवन जगतांना या जगाला शिकवूं पाहत आहे, जीवन अनमोल आहे हे सहजा-सहजी त्यागू नये.

संघर्षाशिवाय जीवन व्यर्थ असल्याची जाणीव करून देण्यासाठी ती व्यक्ती जीवन जगत असल्याचे प्रवाशी त्यातून बोध घेत असतील हे मात्र नक्की. व्यसनापासून दूर राहून संघर्षमय जीवन जगण्याचा त्याचा हा संदेश तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठीच हा पत्र प्रपंच होय!

- Advertisment -

ताज्या बातम्या