Thursday, May 2, 2024
Homeनगरमीटर नसतानाही घराघरांत महावितरणचा अखंड प्रकाश

मीटर नसतानाही घराघरांत महावितरणचा अखंड प्रकाश

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गोरगरिबांची हजार, पाचशे रुपये थकबाकीसाठी वीज खंडित करणार्‍या महावितरण कंपनीने धनिकांच्या घरात मीटर न बसविताही प्रकाश उजळून दाखविल्याचा प्रताप केला आहे. शहराच्या काही प्रभागांत बाह्य स्रोत कर्मचार्‍यांनी हा प्रयोग केला असून वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत. महावितरणच्या दिव्याखाली यानिमित्ताने सर्वत्र काळोख पसरला असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

सन 2011 ला मुळा प्रवरा वीज संस्थेकडून महावितरण कंपनीने कार्यक्षेत्रात कारभार सुरू केला. तेव्हापासून आजतागायत कंपनीला या कार्यक्षेत्रात चांगल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही. बाह्य स्रोत कर्मचार्‍यांच्या भरवशावर कार्यक्षेत्रातील सर्व अभियंते कंपनीचा कारभार करीत आहेत. अभियंते पंख्याखाली बसून बाह्य स्रोत कर्मचारी सांगतील तसे वीज ग्राहकांचे कागद रंगवीत असल्याने कंपनीचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे.

वीज ग्राहकांकडून नवीन वीज जोडणीसाठी अव्वाच्या सव्वा रकमा आकारूनही रीतसर मीटर न देता शेकडो ग्राहकांच्या घरात बाह्य स्रोत कर्मचार्‍यांनी प्रकाश उजळून दाखविला आहे. संबंधित ग्राहकांनाही अद्याप तसेच काही वर्षांपासून वीजबिल न आल्याने तेही बाह्य स्रोत कर्मचार्‍यांकडून रीतसर मीटर बसवून देण्याची मागणी करीत नाहीत. महावितरण कंपनीचा कारभार असा रामभरोसे चालू असल्याने कंपनीला केवळ अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा चुना लागला आहे.

श्रीरामपूर कार्यक्षेत्रात काही बाह्य स्रोत कर्मचार्‍यांनी बोगस कामांचा धुमाकूळ घातला असून संबंधित अभियंते मलाई मिळत असल्याने त्यांच्यावर खुश आहेत. अभियंत्यांना याबाबीची कल्पना असूनही अद्याप अशा प्रकारची कोणतीही कारवाई केलेली नाही. मीटर न देताच आणि वीज जोडणीचे अव्वाच्या सव्वा रकमा आकारूनही या रकमा बाह्य स्रोत कर्मचार्‍यांनी गेल्या काही वर्षांपासून कंपनीकडे भरल्या नसल्याचे समजते.

दरम्यान, याबाबत संबंधित कार्यक्षेत्राच्या अभियंत्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र तुम्ही आम्हाला दाखवा, आम्ही कारवाई करतो, असे सांगून हात वर केले आहेत. दरम्यान, नगरसह श्रीरामपूरच्या कार्यकारी अभियंत्यांचा यासाठी हातभार लागला असल्याची महावितरण कार्यालयात चर्चा सुरू आहे. काही जागृत नागरिक ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन याबाबीची कल्पना देणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या