Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसावध ऐका पुढल्या हाका!

सावध ऐका पुढल्या हाका!

आज 31 डिसेंबर 2021! वर्षाचा अखेरचा दिवस. नववर्ष पूर्वसंध्येचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे स्तोम अलीकडच्या काळात बरेच वाढले आहे. सुबत्तेसोबत ते आणखी वाढत जाणारच. रात्री उशिरापर्यंत रंगणार्‍या पार्टी आणि त्यात घातला जाणारा धिंगाणा असेच काहीसे स्वरुप बहुतेक कार्यक्रमांचे असते. रात्री बारा वाजेपर्यंत सगळीकडे दणदणाट असतो आणि बरोबर बारा वाजता फटाके फोडले जातात. यावर्षीही बहुतेकांनी यासाठी बेत आखले होते. तथापि त्यावर अचानक ओमायक्रॉनचे सावट पडले आहे. करोना विषाणूचा हा अवतार पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला. याचा शिरकाव महाराष्ट्रात 24 नोव्हेंबरला झाला. तेव्हापासुनच या नव्या अवताराला गंभीरपणे घ्या कारण संसर्ग प्रसाराचा त्याचा वेग जास्त आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक वैद्यकीय तज्ञ देत होते. तोंडाला मुसके बांधणे, हात वारंवार धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि सामाजिक अंतर राखणे या निर्बंधांचे कसोशीने पालन हाच संसर्गाला दूर ठेवण्याचा सध्याचा उपाय आहे हे बजावत होते. तथापि किती लोक हे निर्बंध कसोशीने पाळतात? परिणामी लोकांच्या सार्वजनिक वावरावर हळूहळू पुन्हा निर्बंध आणले जातील अशी चर्चा सुरु आहे. दिल्लीत निर्बंध जाहीर झालेच आहेत. पाठोपाठ मुंबईतही सुरुवात झाली आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मुंबईत मनाई करण्यात आली आहे. वर्षाखेर आणि नववर्ष स्वागतासाठी खुल्या किंवा बंदिस्त जागेत कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घातली गेली आहे. ही बंदी 7 जानेवारीपर्यंत लागू असेल. परिस्थिती हळूहळू गंभीर होत आहे हे यावरुन लक्षात येते. विविध निमित्तांनी सार्वजनिकरित्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेकांचे व्यवसाय अवलंबून असतात. त्यासाठी कार्यक्रम साजरा करण्याच्या अनेक अभिनव कल्पना देखील अंमलात आणल्या जातात. त्यांना सरकारी निर्बंध जीवघेणे ठरणारे वाटणे स्वाभाविक आहे. कारण अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूकही केली जाते. तथापि त्यांनी सुद्धा परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करणे सरकारला अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणे सरकारला पसंत नसते. पण निर्बंधांबाबत लोक गंभीर नाहीत. त्यामुळे परिस्थिती पाहून सरकारला निर्णय घ्यावे लागतात असे उपमुख्यमंत्र्यांनी देखील म्हटले आहे. मोठ्या संख्येने लोक निर्बंध पाळत नाहीत आणि संपूर्ण लसीकरणाला सहकार्य करत नाहीत हे वास्तव आहे. राज्यातील साधारणत: अद्याप एक कोटी लोकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही आणि जवळपास 82 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे सांगितले जाते. मुले-मुलींना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांमध्ये थेट लसीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. तसे नियोजन देखील करण्यात आले होते. तथापि महाविद्यालये आणि शाळांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हा प्रस्ताव बारगळल्याचे सांगितले जाते. लोक निर्बंध धुडकावून लावणार असतील आणि करोना लसीकरणास प्रतिसाद देणार नसतील तर सरकार तरी काय करणार! राज्यात ओमायक्रॉनचा प्रसार कुठेकुठे आणि किती प्रमाणात झाला आहे याचा शोध राज्य सरकारने सुरु केला आहे. जगात अन्य काही देशातील अनुभव लक्षात घेता करोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. बुधवारी राज्यात 3900 रुग्ण आढळले. ही तिसर्‍या लाटेची सुरुवात असू शकते असेही काही वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. काही वेळेला अशा धास्तीचा जरुरीपेक्षा जास्त गवगवा होतो का असेही लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. पण सरकारने मात्र सावधगिरीच्या उपायांना प्राधान्य दिले आहे. सरकारला सहकार्य करणे लोकांच्याच हिताचे राहिल. कवी केशवसुत म्हणतात ‘सावध ऐका पुढल्या हाका’ त्यातील मतितार्थ लोक आणि सरकारही लक्षात घेऊन येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी घेतले जाणारे प्रचाराचे मेळावे नेतेमंडळी थांबवतील का अशीही चर्चा जनता करु लागली आहे. फक्त लोकांना उपदेश करण्यापूर्वी काही उदाहरणे आपल्या कृतीने घालून देणे सरकारला शक्य होईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या