श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गेल्या दीड वर्षापूर्वी राज्यात शिवसेनेत उभी फुट पडून राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतरही जनमानसात उध्दव ठाकरे यांच्याबाबत निर्माण झालेली सहानभुती कायम असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र काल एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने समोर आले.
शिवसेनेच्या आमदार फुटीच्या राजकारणानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपाच्या पाठबळावर थेट मुख्यमंत्रीपदावर ताबा मिळविला. तर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने नव्या उमेदीने पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी राज्यभर पक्षबांधणी हाती घेत नवीन पदाधिकारी नेमणुका केल्या. या घडमोडीत गेल्या चार महिन्यापूर्वी शिवसेनेचे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश करुन शिर्डी लोकसभा मतदारसंघात गावोगावी दौरे सुरु करुन संपर्क वाढविण्यास सुरुवात केली. त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, शिवसेना तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, शिवसेना तालुकाप्रमुख लखन भगत, शिवसेना शहर प्रमुख रमेश घुले, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, शहर सचिव राहुल रणधीर, शिव अंगणवाडी महिला जिल्हा संघटक शारदाताई कदम, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक यादव, उपशहर प्रमुख सचिन रसाळ, उपशहर प्रमुख प्रवीण शिंदे, उपशहर प्रमुख रोहित भोसले आदी फिरताना दिसत आहे.
शिवसेनची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसली तरी संभाव्य उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव चर्चेत असताना काल अचानक गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकार परिषद घेवून आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगून मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला असून आमचे नेते उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत व विनायक राऊत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याचा दावा केला. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
या पत्रकार परिषदेस विधानसभा तालुका संघटक संजय छल्लारे, शिवसेना ग्राहक संघटनेचे जिल्हा संघटक अशोक थोरे, शिवसेना नेते अरुण पाटील, सुधाकर तावडे, माजी जिल्हा उपप्रमुख देवीदास सोनवणे, विठ्ठलराव फरगडे, उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ व सचिन लाटे, शेखर दुबैय्या, तेजस बोरावके, सुधेधीर वायखिंडे, बाबासाहेब गायकवाड, विजय गव्हाणे, दत्तात्रय कडू, दिघीचे सरपंच राधाकिसन डांगे, ज्ञानेश्वर गर्जे, विकास भांड, राजेंद्र खडके, अशोक मगर, संजय साळवे, शिवाजी सिनारे, माधव टिपरे, शरद गवारे, प्रमोद गायकवाड, बापू बुधेकर, सिध्दांत छल्लारे, आदी उपस्थित होते.
मात्र माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सोबत असलेले पक्षाचे सचिन बडदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या पत्रकार परिषदेस गैरहजर होते. प्रमुख पदाधिकार्यांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी श्री. कांबळे यांना छेडले असता आम्ही सर्व एकत्र आहोत. काही कामामुळे ते आले नसावेत असा खुलासा त्यांनी केला.
याबाबत उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे प्रतिक्रिया देताना म्हणाले, या पत्रकार परिषदेची आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती आणि निरोप ही नव्हता. शिवसेनेमध्ये उमेदवारी मागायची ही पद्धत नाही. ज्यावेळेस मी स्वतः माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते त्यावेळी याच लोकांनी भाऊसाहेब कांबळे यांच्याविरुद्ध व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्या लोकांचे पुढे काय झाले आणि उमेदवारी कोणाला मिळाली हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
गेली तीन वर्षे शिवसेनेचा गड असलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या आधीच ठाकरे सेनेत दुफळी निर्माण झाल्याचे या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे. याची पक्षश्रेष्ठींनी वेळीच दखल घेतली नाही तर याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागेल, अशी चर्चा सुरु झाली आहे.