Friday, May 3, 2024
Homeनगरलोणी दरोड्यातील 5 आरोपी जेरबंद

लोणी दरोड्यातील 5 आरोपी जेरबंद

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

लोणी येथील सराफाची जवळपास 21 किलो चांदी व 4 तोळे सोने अशा विविध दागिन्यांची बॅग कोयत्याचा धाक दाखवून पल्सर मोटारसायकलवर पळवून

- Advertisement -

नेणार्‍या पाच अट्टल दरोडेखोरांना शिर्डी पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपींकडून सुमारे 14 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कस्टडीचे आदेश दिले आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत असे की, लोणी येथील सराफ संतोष मधुकर कुलथे दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपले दुकान बंद करून दुकानातील 21 किलो चांदी तसेच 4 तोळे सोने बॅगमध्ये भरून चारचाकी गाडीमध्ये ठेवत असताना पल्सर मोटारसायकलवर आलेल्या चार तरुणांनी धमकावून दागिन्यांची चोरी केली होती.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना श्री. घुगे यांना गुप्त खबरीने दिलेल्या माहितीवरून सदरील गुन्हा सावळीविहीर येथील नवनाथ साहेबराव गोर्डे याने आपल्या सहकार्‍यांना बरोबर घेऊन केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने थेट पुणे व शिरूर परिसरात जाऊन मोठ्या शिताफीने नवनाथ साहेबराव गोर्डे (वय 32) रा. सावळीविहीर, अतुल चंद्रकांत आमले (वय 24) रा. कर्वेनगर पुणे, सागर गोरख मांजरे (वय 23) रा. मातापूर श्रीरामपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत प्रविण नानासाहेब वाघमारे (वय 24) रा.पिंपळस, राहाता व दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेल्या 2 पल्सर मोटारसायकल, सोन्या-चांदीचे दागिने जवळपास 14 लाख 53 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा माल शिरूर येथील सराफ सदाशिव प्रल्हादराव टाक (वय 47) यास विकण्यात आला होता, असे तपासात समोर आले.

यातील नवनाथ साहेबराव गोर्डे याच्यावर शिर्डी येथील पोलीस स्टेशनला 5 तर कोपरगाव पोलिसांत 1 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर अतुल चंद्रकांत आमले यांच्यावर पुणे जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये 24 गुन्हे दाखल आहेत. सागर गोरख मांजरे याच्यावर नगर जिल्ह्यात 15 गुन्हे दाखल असून प्रविण नानासाहेब वाघमारे याच्यावर खुनासह 2 गुन्हे शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहेत.

गुन्ह्यात पाच आरोपीसह दोन अल्पवयीन मुले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 395, 492, नुसार आर्म अ‍ॅक्ट हे वाढीव कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिली.

कोणताही पुरावा नसतांना ही शिर्डी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण नव्याने पदभार घेतले असलेल्या उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी आपल्या कामाची चुनुक दाखवून दिली आहे.

सदरील गुन्ह्यात अतिशय बारकाईने तपास केला जात असून यात आणखी कोणी सहभागी आहे का? सराईत आरोपींना कोणी मदत केली आहे का त्यांच्या सहवासात या काळात कोण होते याचा देखील तपास करून त्यांना देखील जेरबंद करण्यात येईल. गुन्हेगारीबाबत कोणाला काही माहिती असेल तर नागरिकांनी शिर्डी पोलिसांना देण्यासाठी पुढे यावे. माहिती देणार्‍या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल.

– संजय सातव, उपविभागीय अधिकारी शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या