अहिल्यानगर । प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. विशेषतः, पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्री ३ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला बसला आहे. अनेक तास सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे करंजी आणि मढीसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून, काही लोकांना झाडांवर चढून आपला जीव वाचवावा लागला. या पावसामुळे काही जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग, तसेच पाथर्डी-बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर काही ठिकाणची वाहतूक हळूहळू पूर्ववत सुरू झाली आहे.
पाथर्डी शहरातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कसबा भागातील खोलेश्वर मंदिर आणि तपनेश्वर मंदिर परिसरात पाणी साचले आहे. तसेच, आमराई मंदिरालाही पाण्याचा वेढा बसला आहे. शहरासह परिसरात अनेक तास कोसळणाऱ्या या पावसामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या असून, शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. तसेच, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून मदतकार्य सुरू केले असून, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.




