मुंबई । Mumbai
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या बीडमधील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आता वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला असून, आज मुंबईतील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत दोन संशयितांची ‘नार्को’ (Narco Test) तर एकाची ‘ब्रेन मॅपिंग’ (Brain Mapping) चाचणी केली जाणार आहे. या चाचण्यांमुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती, मात्र प्रदीर्घ काळ उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी सातत्याने आंदोलने केली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली.
एसआयटीने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून अत्यंत गोपनीयता पाळत तपासाची चक्रे फिरवली आहेत. गेल्या सहा महिन्यांत सुमारे २०० लोकांची कसून चौकशी करण्यात आली असून ५०० हून अधिक व्यक्तींचे कॉल डिटेल्स तपासले गेले आहेत. याव्यतिरिक्त १२ जणांची मानसशास्त्रीय तपासणीही करण्यात आली आहे. यापूर्वीच या प्रकरणातील तीन महत्त्वाच्या साक्षीदारांची नार्को चाचणी पूर्ण झाली असून, आज उर्वरित तीन संशयितांपैकी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जात आहे. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर या हत्येमागचे नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत.
या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचा संशय मुंडे यांच्या कुटुंबीयांनी आणि काही साक्षीदारांनी व्यक्त केला आहे. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट म्हणून काम करत असतानाच त्यांचा प्लॉटिंगचाही व्यवसाय होता. केवळ १२ गुंठे जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संशयित गोट्या गीते याचा तपासही अद्याप सुरूच आहे. वैज्ञानिक चाचण्यांच्या माध्यमातून आता सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एसआयटीकडून केला जात आहे.
विजेच्या वेगाने घडणाऱ्या या घडामोडींमुळे आरोपींचे धाबे दणाणले आहेत. न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत होणाऱ्या या चाचण्यांचे रेकॉर्डिंग केले जाणार असून, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडेल. मुंडे यांच्या पत्नीने केलेल्या संघर्षामुळे आज तपास या टप्प्यावर पोहोचला असून, या वैज्ञानिक चाचण्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





