Thursday, April 9, 2026
Homeदेश विदेशAjit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण,...

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय म्हटलंय?

दिल्ली । Delhi

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत ‘विमान अपघात तपास ब्युरो’ने (AAIB) प्रथमच अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या भीषण अपघातात विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सना (ब्लॅक बॉक्स) आगीचा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीत हे रेकॉर्डर्स बराच वेळ राहिल्याने त्यातील डेटा मिळवण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

विमान अपघात तपास ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र रेकॉर्डर्स होते. यापैकी ‘डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (DFDR) जो L3 कम्युनिकेशन्स कंपनीचा आहे, त्यातील डेटा यशस्वीपणे मिळवण्यात (Download) ब्युरोला यश आले आहे. मात्र, वैमानिकांमधील संवाद रेकॉर्ड करणाऱ्या ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ (CVR) ची स्थिती गंभीर आहे. हे उपकरण हनीवेल कंपनीचे असून, त्यातील डेटा सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आता संबंधित उत्पादक देशाच्या (अमेरिका) अधिकृत प्रतिनिधींची मदत मागण्यात आली आहे.

या तपासाबाबत अधिक माहिती देताना ब्युरोने स्पष्ट केले की, हा तपास आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) आणि विमान अपघात नियम २०१७ च्या निकषांनुसार अत्यंत पारदर्शकपणे केला जात आहे. सद्यस्थितीत तांत्रिक तपास सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे तर्क-वितर्क लढवू नयेत, असे आवाहनही यंत्रणेने केले आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच हा तपास पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही ब्युरोने दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, “अजितदादांच्या अपघाताला २० दिवस उलटले तरी तपासाला अपेक्षित वेग आलेला नाही. ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची जी माहिती आता येत आहे, ती शक्यता मी पाच दिवसांपूर्वीच वर्तवली होती.” विमान पुरवठा करणाऱ्या कंपनीला (VSR Ventures) पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ तर दिला जात नाही ना, असा संशयही त्यांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा ‘अपघात की घात’ हे सत्य समोर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ हा प्रत्यक्षात नारंगी रंगाचा असतो आणि तो अत्यंत सुरक्षित मानला जातो. यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) अशा दोन भागांचा समावेश असतो. साधारणपणे ३० दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप असलेल्या या यंत्रणेचा वापर अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी केला जातो. अजित पवार यांच्या प्रकरणात या ब्लॅक बॉक्समधील डेटा किती प्रमाणात हाती येतो, यावरच अपघाताचे गूढ अवलंबून असणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...