मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट व इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत महत्वाची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले, “देशात एकेकाळी प्रचंड सामाजिक विषमता होती. अनेकांना मानवी हक्कांपासून वंचित रहावे लागत होते. अशा कठीण काळात बाबासाहेबांनी ज्ञान, परिश्रम आणि संघर्षाच्या बळावर समाजजागृती केली, समतेची बीजं रोवली आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसमावेशक संविधान दिलं. आज भारत (India) जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच तिसऱ्या स्थानी पोहोचेल. या प्रगतीची पायाभरणी जर कोणी केली असेल, तर ती बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यांच्या संविधानामुळेच देशात बंधूता, समानता आणि संधींचे समत्व टिकून आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, “नुकतेच न्यू जर्सीचे गव्हर्नर भेटले होते. त्यांनी अमेरिकेतील (America) वीज व्यवस्थापनातील काही अडचणींचा उल्लेख केला. त्यावेळी मला आठवले की मंत्रीपद स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी घेतलेला पहिलाच मोठा निर्णय म्हणजे ‘राष्ट्रीय वीज ग्रिड’ची कल्पना. आज देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचते, त्याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला जाते, असे म्हणत त्यांनी एक उल्लेखनीय किस्सा सांगितला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संविधानाला सर्वोच्च धर्मग्रंथ मानतात. जगातील सर्वोत्तम संविधान म्हणजे भारताचे संविधान. सामान्य माणसापासून ते गुंतागुंतीच्या समस्यांपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संविधानात आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
इंदू मिलमधील स्मारकाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबत बोलतांना सांगितले की, “सध्या स्मारकाचे ५० टक्के काम झाले असून, पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि ३५० फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतीपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे दिमाखदार स्मारक खुले होईल”, असे त्यांनी म्हटले. पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार असल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे.




