मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज सर्वच पक्षांचे उमेदवार (Candidate) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा (Mahayuti and Mahavikas Aaghadi) अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नसन तो दुपारपर्यंत सुटण्याची शक्यता आहे. अशातच आता भाजपने आपल्या दोन उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
भाजपने मीरा-भाईंदर आणि उमरेड (Meera-Bhainder and Umred) या दोन विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात मीरा-भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उमरेडमधून सुधीर पारवे (अनुसूचित जाती) यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजप (BJP) उमेदवारांची संख्या १४८ वर पोहोचली आहे.
दरम्यान, मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) या २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी नंतरच्या काळात शिवसेना (एकनाथ शिंदे) पाठिंबा दिला होता. त्यामुळे मीरा-भाईंदरची जागा महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. गीता जैन आणि नरेंद्र मेहता या दोघांनीही सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नरेंद्र मेहता यांच्या पारड्यात दान टाकले आहे.