नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज बुधवार (दि. २० नोव्हेंबर) सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदारांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. मात्र, अशातच आता जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. हे मतदार गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदानाला निघाले होते. यावेळी समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडविल्यामुळे हा राडा झाल्याचे समजते. त्यामुळे नांदगावमध्ये वातावरण तापले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दुसरीकडे नांदगाव मतदारसंघातील १६४ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तब्बल दोनदा बंद पडले आहे. न्यू. इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार घडला आहे. मतदार तब्बल दोन तासांपासून मतदानासाठी ताटकळत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावली असून मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदारांना आपला हक्क बजावता आलेला नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा