बारामती । Baramati
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहे. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचं नमूद करत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले. “मी राज्यसभेत आहे, अजून माझं दीड वर्ष आहे, आता या दीड वर्षानंतर आता राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कसलीच निवडणूक लढणार नाही. आता किती निवडणुका लढणार? १४ निवडणुका केल्या. आणि तुम्ही असे लोक आहात की कधीच घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देताय. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय. याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा आणि काम करत राहणार. असं शरद पवार म्हणाले.
यावेळी अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. “काही लोकं सांगतात, मी लोकांना सांगेल भावनेने आवाहन करेल, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. सुप्रिया सुळे यांना ४८ हजार मते जास्त देईल, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया. मला आता आमदारकी नको , खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र इथले प्रश्न सोडवेल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.