अहिल्यानगर (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने मित्रपक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली. पण यातील कोण थांबणार आणि कोण लढणार हे दिवाळीनंतरच म्हणजेच सोमवारी स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीसाठी आज शनिवारी आणि उद्या रविवार (दि.3) महत्वाचा असून रविवारी हा इच्छुकांच्या मनधरणीचा सुपर संन्डे ठरणार आहे.
महाविकास आघाडी व महायुतीने जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीत व महायुतीत प्रत्येकी तीन-तीन घटकपक्ष आहेत. एका पक्षाला उमेदवारी मिळाल्याने इतर दोन पक्षांत कमी अधिक प्रमाणात नाराजी आहे.
काहींनी उमेदवारी अर्ज दाखल करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे; पण पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन अपक्ष निवडणूक लढविणे मोठे आव्हान असते, असे असले तरी बड्या नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण, ते खरोखर लढणार की थांबणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, गुरूवारपासून दिवाळीची सुरूवात झाली. शुक्रवारी लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर शनिवारी पाडवा आणि रविवारी भाऊबीज आहे. दिवाळी हा वर्षाचा सण असून या काळात सर्वजण आपआपल्या घरीच थांबतात.
पाडावा आणि भाऊबीजीच्या दिवशी नातेवाईकांसह मित्रांच्या भेटी होत असल्या तरी जाहीर प्रचारात या काळात खंड पडणार आहे. जिल्ह्यात अनेक मतदारसंघात माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने त्यापूर्वी रविवारी अपक्षांच्या मनधरणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.