मुंबई | Mumbai
काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या (Kolhapur North Legislative Assembly) काँग्रेसच्या (Congress) अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांनी अखेरच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) देखील भडकले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
हे देखील वाचा : Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती
या व्हिडीओत सतेज पाटील मला तोंडघशी का पाडलात, लढायचे नव्हते तर आधीच सांगायचे होते, हे बरोबर नाही महाराज असे म्हणताना दिसत होते. त्या सर्व प्रकरणावर आता खासदार छत्रपती शाहू महाराजांनीच (MP Chhatrapati Shahu Maharaj) भूमिका स्पष्ट केली आहे. शाहू महाराजांनी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यात काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नाही, एकाच कुटुंबात दोन पदे नको ही आपली पहिल्यापासून भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप, म्हणाले लोकसभेला…
छत्रपती शाहू महाराजांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सौ.मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही. एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. राजेश लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती.लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला.काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत, असे शाहू महाराजांनी पत्रात म्हटले आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा
सतेज पाटलांनी अपमान केला का?
सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो. असे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Nashik Crime : तोतया आयपीएसचे कारनामे उघड; आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी बनला बोगस अधिकारी
खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा
विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे, असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा