मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी आज (दि.०६ मार्च) रोजी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी दोन लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्य संपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेत पाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा, कुंभमेळा तयारी, उद्योग आणि वाहतूक यासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा देखील त्यांनी केल्या.
यावेळी ते म्हणाले की, मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा विकास करण्यासाठी नीती आयोग स्वतंत्र रोडमॅप तयार करणार आहे. यामुळे नाशिकला राज्याचे एक प्रमुख आर्थिक केंद्र (Economic Hub) म्हणून विकसित केले जाईल. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे मंजूर असून, रस्ते, पाणीपुरवठा, नदी घाट, वाहतूक व्यवस्था आणि शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे फडणवीसांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाच्या कामांना गती दिली जाणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला व रोजगार निमिर्तीला मिळणार चालना
औद्योगिक विकासालाही चालना देण्यासाठी राज्य शासनाने उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला असून नाशिक-सिन्नर-ओझर औद्योगिक पट्ट्यात गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकर्यांना कर्जमाफीचा मोठा फायदा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत सप्टेंबर २०२५ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकर्यांना होणार असल्याचे बोलले जाते. तसेच राज्य जल माहिती केंद्र नाशिक येथे उभारण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या केंद्राच्या इमारतीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक विमानतळ विस्तारासाठी निधी
राज्यातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नाशिक विमानतळाच्या विस्तारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक वाढीसाठी महत्त्वाची मदत होणार आहे. दरम्यान नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६४० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. याद्वारे नवीन टर्मिनल आणि प्रवाशांची क्षमता प्रतितास ३०० वरून १,००० पर्यंत वाढवली जाईल. तसेच नाशिक शहराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ७,५०० कोटी रुपयांच्या रिंग रोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून, केंद्र सरकारकडून त्यास ३,५०० कोटींचे सहाय्य अपेक्षित आहे.





