नाशिक | Nashik
महत्त्वाची खाती आणि मंत्रिमंडळातील संभाव्य वादग्रस्त नावांवरून लांबलेला महायुती सरकारचा (Mahayuti Government) पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आज रविवारी (दि.१५) रोजी नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकून सरकारच्या चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) काही जुन्या माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या (Nagpur) राजभवन येथे दुपारी चार वाजता फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन नऊ दिवस झाले आहेत. मात्र प्रमुख खात्यांसाठी सुरू असलेली चढाओढ, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना वगळण्यासाठी होणारा आग्रह यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. मात्र महायुतीतील नेत्यांमध्ये दररोज होणाऱ्या चर्चेतून मार्ग काढत आज शपथविधीचा मुहूर्त काढला आहे.
महायुतीत आज सकाळपासून नेत्यांना फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
यात उत्तर महाराष्ट्रातून आतापर्यंत सहा आमदारांना मंत्रिपदासाठी (Ministership) फोन गेले आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले दादा भुसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तसेच भाजपकडून जामनेरचे आमदार गिरीश महाजन, धुळ्याचे आमदार जयकुमार रावल आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन आला आहे.
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा उपाध्यक्ष राहिलेल्या नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. काल रात्रीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा फोन आला होता. त्यानंतर आता ते मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत. झिरवाळ हे पहिल्यांदाच मंत्री होत असून ते २०१९-२०२४ याकाळात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते. तर १९९९ ते २०२४, २००९ ते २०१४, २०१९-२०२४ या तीन टर्ममध्ये आमदार होते. आता ते चौथ्यांदा पुन्हा निवडून आले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते आणि मागील सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. त्यामुळे भुजबळ हे फोनसाठी वेटिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदासाठी फोन येतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.