मुंबई | Mumbai
बिहारमध्ये भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं असून बिहार विधानसभेत आता एनडीएची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळीही विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारच्या विजयावर प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस नेमंक काय म्हणाले?
बिहारच्या जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यांनी मोदीजींच्या नेतृ्त्वावर विश्वास ठेवून आणि नितीश कुमार यांच्या विकासावर विश्वास ठेवून आमच्या घटकपक्षांसह एनडीएला प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्यात २०१० चा रेकॉर्ड तुटू शकेल असा निकाल लागला आहे. मोदींवर बिहारचा विश्वास आहे ते दिसून येते आहे. नितीश कुमार यांची स्वच्छ आणि प्रशासक अशी जी छबी आहे त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. चिराग पासवान, मांझी यांच्यासह आमची युती होती आम्हाला खूप चांगला प्रतिसाद बिहारच्या जनतेने दिला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या विषारी प्रयोगाला जनतेने उत्तर दिलं
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार सुरू केलाय, त्याला जनतेने उत्तर दिलेय. संवैधानिक संस्थांवर आरोप करणे, संवैधानिक मार्गाने चालणाऱ्या कारभाराला विरोध करणे, जनतेच्या मताधिक्याला विरोध करणे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअर आहे. राहुल गांधींनी व्होट चोरीचा मुद्दा काढला, त्यावर यात्रा काढली, नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करुन बघितला. पण, लोकांचा विश्वास हा मोदीजी आणि नितीशकुमार यांच्यावर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.
विकास आणि सुशासन मुद्दा प्रमुख ठरला
फडणवीस पुढे म्हणाले, जातीचा मुद्दा आणि इतर सगळे मुद्दे मागे पडले आहेत. बिहारच्या जनतेसाठी विकास आणि सुशासन हाच मुद्दा प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी, नितीशजी हाच मुद्दा ठरला आहे. मी ज्या ठिकाणी प्रचार केला तिथेही लक्षात येत होते की एनडीए खूप चांगल्या परिस्थितीत आहे. काही प्रमाणात अँटी इन्कंबन्सी मागच्या निवडणुकीच्या वेळी दिसली ती यावेळी अजिबातच दिसली नाही. प्रो इन्कंबन्सीचाच हा विजय आहे. १६० जागांच्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले होते. पण बिहारच्या जनतेने आम्हाला त्याही पेक्षा जास्त मतदान केले आहे.
राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत त्यांच पतनच होत राहील
जोपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतनच होत राहिल. हे लोक कोर्टात गेले तिथे हरले. त्यानंतर निवडणूक आयोगाने कांग्रेसला चॅलेंज दिलं तुम्ही येऊन पुरावे घेऊन या. पण ते गेलेही नाहीत. कारण त्यांनाही माहीत आहे की आपण खोटं बोलत आहोत. लोकसभेच्या वेळीही त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला होता. तो फार काळ चालला नाही. लोकांना समजलं की तो फेक नरेटिव्ह होता. बिहारपेक्षा वाईट स्थिती त्यांची भविष्यात होत राहिल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आमचे वरिष्ठ नेते आणि मोदी निर्णय घेतील. बिहारमध्ये महिलांनी कायमच एनडीएला मतं दिली आहेत. फक्त महिलाच नाही युवांनीही मतदान भरभरुन दिलं आहे. मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




