मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी ही परीक्षा (Exam) आता पुढे ढकलण्यात आली असून ती ०३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडणार आहे. आयोगाने याबाबतचे अधिकृत शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळाला आहे.
या परीक्षेद्वारे तलाठी पदांसह विविध गट-क संवर्गातील पदांची भरती केली जाते.आयोगाने प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यामागे कारणेही समोर आली आहेत. त्यानुसार राज्यातील विविध परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल.सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि परीक्षार्थींना केंद्रावर (Centre) वेळेत व सुरक्षितपणे पोहोचता यावे यासाठीचा विचार. राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि आगामी हिवाळी अधिवेशन ही प्रमुख कारणे आहेत.
परीक्षा पद्धत आणि सूचना
ही परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच पारंपारिक (ओएमआर आधारित) पद्धतीने पार पडेल. परीक्षेची वेळ, विशिष्ट केंद्र, प्रवेशपत्र (Admit Card) आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळेत प्रसिद्ध केल्या जातील.परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अद्ययावत माहितीसाठी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in / mpsconline.gov.in) नियमित भेट द्यावी, असे आवाहन ‘एमपीएससी’चे उपसचिव (जाहिरात) विवेक देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.




