पुणे । Pune
राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असतानाच आता हवामानाने पुन्हा एकदा आपला रोख बदलला आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर आता प्रचंड उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी आता उष्माघातापासून काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, पुढील २४ ते ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
त्याचप्रमाणे कोकणात पूर्वेकडून येणाऱ्या गरम आणि दमट वाऱ्यांमुळे उष्णतेचे प्रमाण अधिक वाढणार आहे. कोकणपट्ट्यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. येत्या काही दिवसांत दमट आणि तापदायक हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत उष्णतेच्या लाटा अधिक वेळा येण्याची शक्यता आहे. सध्या उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा नसून तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
सावधगिरी बाळगा:
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उन्हात जाणे टाळा
पुरेसे पाणी प्या, शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा
वृद्ध, लहान मुले आणि शेतकरी वर्गाने विशेष काळजी घ्या