Friday, July 24, 2026
Homeराजकीयधक्कादायक! महाराष्ट्रात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ; विधानसभेत आकडेवारी सादर

धक्कादायक! महाराष्ट्रात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ; विधानसभेत आकडेवारी सादर

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाने विधानसभेत सादर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आकडेवारी सभागृहात मांडली असून, वाढती संख्या हा अत्यंत गंभीर चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

- Advertisement -

शासनाने दिलेल्या तुलनात्मक माहितीनुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये बेपत्ता होणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ मध्ये बेपत्ता महिलांची संख्या ४५ हजार ६६२ होती, तर ११ हजार ३१६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. मात्र, २०२५ मध्ये ही आकडेवारी वाढून महिलांच्या बाबतीत ४८ हजार २७८ आणि अल्पवयीन मुलींच्या बाबतीत १३ हजार ११३ इतकी झाली आहे. म्हणजेच एका वर्षात बेपत्ता महिलांच्या संख्येत २,६१६ तर अल्पवयीन मुलींच्या संख्येत ७९७ ने वाढ झाली आहे.

या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी आणि मानवी तस्करीसारखे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आता विशेष तांत्रिक मदतीचा वापर करत आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’चा उल्लेख केला. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पोलिसांनी ४१ हजार १९३ लहान मुले आणि मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात यश मिळवले आहे.

तपास प्रक्रियेबाबत माहिती देताना फडणवीस यांनी सांगितले की, बेपत्ता महिलांपैकी साधारणपणे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्याच वर्षात सापडतात. अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत हा शोध घेण्याचा दर ९० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे महिलांचा शोध घेण्याच्या दरात गेल्या काही काळात १० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. मात्र, ९५ ते ९६ टक्के शोध दरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असून तोपर्यंत विशेष शोध मोहिमा सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संकटातील एका सामाजिक बाजूवर बोट ठेवताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा मुली किंवा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर वर्षभरानंतर त्यांचे कुटुंबीय पाठपुरावा करणे सोडून देतात, ही बाब चिंताजनक आहे. शोधमोहिमेत सातत्य राखण्यासाठी दर महिन्याला महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेतली जाते. कोणत्या पोलीस ठाण्याने सर्वाधिक बेपत्ता व्यक्तींचा शोध लावला, याचे आता स्वतंत्र मूल्यमापन केले जात असून उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेतली जात आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...