मुंबई | Mumbai
राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेसने (Congress) सोशल मीडियाद्वारे (Social Media) ‘गुंगी गुडिया’ अशी टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस कार्यालयात प्रवेश करत आंदोलन केले.
काँग्रेस कार्यालयात नेमकं काय घडलं?
आज (मंगळवारी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Worker) तिथे धडक दिली. यावेळी त्यांनी ज्या एक्स (ट्विटर) पोस्टवरून सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवण्यात आले, त्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे भांडण काँग्रेस पक्षाशी नसून, अपमानकारक पोस्ट करणाऱ्याविरोधात हे आंदोलन आहे,” असे स्पष्ट केले.
सूरज चव्हाण यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी काँग्रेसच्या वैचारिक पातळीवर आणि भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “काँग्रेसच्या नेत्यांना कदाचित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विचारांचा विसर पडला असावा. इंदिराजींप्रमाणेच सुनेत्रा पवारही भविष्यात इतिहास रचतील.एकीकडे महिला सन्मानाची आणि ‘दुर्गा’ बनण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे महिला नेत्यांचा असा अपमान करायचा, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे” असे सुरज चव्हाण यांनी म्हटले.
काँग्रेसला चर्चेचे आव्हान
सुनेत्रा पवार सर्व प्रश्नांवर उत्तरे देत आहेत. परंतु काँग्रेस नेत्यांना स्वतःच्या सोयीचे तेवढेच दिसते. त्यांचे कान बहिरे झाल्यामुळे त्यांना उत्तर ऐकू येत नसावे. महिलेला कमी लेखणे ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, हे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर करावे. ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जातात, हेच आम्हाला पाहायचे आहे,” असा इशाराही सुरज चव्हाण यांनी दिला.
नेमका वाद काय आहे?
काँग्रेसने बीड दौऱ्यातील (Beed Tour) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत होत्या. हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने “सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला होता. या शब्दांवर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर महिलांचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आणि त्यांना कमी लेखल्याचा आरोप केला आहे.




