मुंबई | Mumbai
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आज (दि.४) रोजी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृतीचं कारण पुढे करून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, यावर आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाकडून एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या सहीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे”, असे त्यात म्हटले आहे.
पत्रात पुढे म्हटले की, “धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राजीनामा दिल्यांनतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यांनतर एक्सवर (ट्विट) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात (Court) दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे”, असे मुंडे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.