मुंबई | Mumbai
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज (शनिवारी) पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, काल (शुक्रवार) या कार्यक्रमावरून पुण्यात (Pune) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या कार्यक्रमासाठी पैसे देऊन आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून गर्दी जमवली जात असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट आणि सोशल इन्फ्लुएंसर्सचा वापर
यावेळी ते म्हणाले की, “राहुल गांधींच्या कार्यक्रमात येणाऱ्या मुलींपैकी ९० ते ९५ टक्के मुली या काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या कॉलेजमधील आहेत. केवळ त्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जात आहे. याशिवाय पैसे देऊन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना बोलविण्यात आले असून, राहुल गांधींनी पक्षाबाबत केवळ ‘पॉझिटिव्ह कंटेंट’ (सकारात्मक माहिती) पोस्ट करण्याची अट घातली आहे. नकारात्मक मजकूर टाकल्यास पैसे दिले जाणार नाहीत”,असे स्पष्ट सांगण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
कोट्यवधी रुपयांची उधळण; पोलिसांकडून कारवाईची शक्यता
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधींच्या या कार्यक्रमावर ९ ते १० कोटी रुपयांची उधळण केली जात असून ३ हजार लोकांसाठी प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप केला होता. या पैशांचा स्रोत काँग्रेसने जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी दिले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नवनाथ बन यांनी पुराव्यांच्या आधारे हे आरोप केले असून त्याची योग्य पडताळणी केली जाईल. हा केवळ एक स्टंट असून सिनेमा रिलीज होण्यापूर्वी जसा वाद निर्माण केला जातो, तसाच प्रकार काँग्रेस करत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे फडणवीस यांनी म्हटले.
पुण्यात अभाविप-एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यात विद्यार्थी संघटना ‘अभाविप’ (ABVP) आणि विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’ (NSUI) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा पलटवार काँग्रेस नेत्यांनी केला आहे.




