मुंबई | Mumbai
राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईत येत्या ०५ जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असणार आहे. या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मात्र, या मोर्चाआधी महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ” हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे १६ एप्रिल २०२५ आणि १७ जून २०२५ हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे त्यांनी म्हटले. तसेच हिंदी भाषा ही ऐच्छिक आहे, तर मराठी अनिर्वाय आहे”, असेही फडणवीस म्हणाले. .
पुढे ते म्हणाले की, “त्रिभाषा सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल.नरेंद्र जाधव हे कुलगुरू होते, ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. आपण त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “आजच्या अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहा पानासाठी बोलवले होते. परंतु, नेहमीच्या पद्धतीने विरोधी पक्षाने चहा पानावर बहिष्कार टाकला. हा बहिष्कार टाकताना त्यांनी एक भलं मोठं पत्र दिले आहे. पत्र मोठे असले तरी मजकूर फार नाही. मागच्या पत्रातीलच मुद्दे मोठ्या अक्षरात दिले आहेत .एक दोन नवीन विषय आहेत असून त्यात मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, विरोधकांच्या या पत्रामध्ये व्याकरणाच्या २४ चुका आहेत. तसेच आजच्या पत्रावर भास्कर जाधव यांची सही दिसत नाही. सह्यांमध्ये पाच तीन दोन झाले आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत आमच्या कामांना स्थगिती मिळाली असे म्हटले. त्यांना अजूनही हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असंच वाटतंय “, असे म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला.




