Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVijay Wadettiwar : "आमच्याकडे नाशिक हनीट्रॅप प्रकरणाची सीडी, वेळ आल्यावर..."; काँग्रेस आमदार...

Vijay Wadettiwar : “आमच्याकडे नाशिक हनीट्रॅप प्रकरणाची सीडी, वेळ आल्यावर…”; काँग्रेस आमदार वडेट्टीवारांचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

गेल्या आठवडाभरापासून राज्यात हनीट्रॅप (Honey Trap) प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात राज्यातील ७२ आजी-माजी अधिकाऱ्यासह माजी मंत्री देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. या हनीट्रॅप प्रकरणाचा सूत्रधार नाशिकचा (Nashik) असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणावर काल (शुक्रवारी) विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती देतांना ‘ना हनी आहे ना ट्रॅप’ असे म्हणत कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनीट्रॅपची तक्रार नाही, असे म्हटले होते.

- Advertisement -

विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्द्य उपस्थित करण्यात आल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “काल विधानसभेत मुख्यमंत्री (CM) ‘ना हनी आहे ना ट्रॅप’ असे म्हटले. पण, त्यासंदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे”, असे त्यांनी सांगितले.

YouTube video player

पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, “मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, एवढे मोठे ते प्रकरण आहे. त्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावे लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल इतका मोठा भक्कम पुरावा आहे, असा दावा करत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत हनीट्रॅप प्रकरणावरून सरकारला घेरले होते. मला कुणाचेही चारित्र्यहनन करायचे नाही. परंतु सरकार या प्रकरणावर संवेदनशील आहे की नाही? जर सरकार संवेदनशील असेल तर मग उपमुख्यमंत्री (DCM) निवेदन का सादर करत नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच माझ्याकडे हनीट्रॅप प्रकरणाशी संबंधित पेनड्राईव्ह आहे. तो पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो”, असेही त्यांनी म्हटले होते.

हनीट्रॅप प्रकरण नेमकं काय?

काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांवेळी राज्यातील ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता. नाशिकच्या (Nashik) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच एका महिलेने मुंबई नाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देखील दाखल होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली असून, हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरु असल्याचे बोलले जात आहे.

तसेच ठाणे गुन्हे शाखेकडे हनीट्रॅपच्या एकूण तीन तक्रारी आल्या असल्याचे सांगितले जाते.सध्या या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी पोलिसांकडून सुरू असून, नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरुपांचे आरोप असून, उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक करु नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...