Friday, September 25, 2026
HomeUncategorizedNashik News : गिरणा गौरव पुरस्कारांचे वितरण

Nashik News : गिरणा गौरव पुरस्कारांचे वितरण

समाजपरिवर्तनासाठी शिक्षणक्रांतीची गरज - डॉ. सुधीर गव्हाणे

नाशिक | प्रतिनिधी
आज जग एका कठीण परिस्थितीतून जात असून हिंसेला मिळत असलेले प्रोत्साहन चिंतेचा विषय आहे. समाजाचे अध:पतन रोखण्यासाठी केवळ पदव्यांची नव्हे, तर खर्‍या अर्थाने माणसाला माणूस बनवणार्‍या शैक्षणिक क्रांतीची गरज आहे. समाजातील दूषित वातावरण स्वच्छ करण्यासाठी आपल्याला बाबा-बुवांची नाही, तर चांगल्या शिक्षणतज्ज्ञांची आवश्यकता आहे, असे परखड प्रतिपादन महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.येथील कालिदास कलामंदिर नाट्यगृहात गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ’गिरणा गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

गोदाआरतीने प्रारंभ झालेल्या सोहळ्याच्या सुरुवातीला गिरजा महिला मंचच्या सदस्यांनी दीपप्रज्वलन केले. डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले की, सध्या जगात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू आहे. मात्र, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांनी दिलेला शांती व अहिंसेचा संदेशच मानवाचा खरा विकास करू शकतो. युद्धावर होणारा अवाढव्य खर्च थांबवून तो मानवी विकास, गरिबी निर्मूलन आणि मूल्यशिक्षणावर खर्च व्हायला हवा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शिक्षण संस्थांच्या अवस्थेवर चिंता
कार्यक्रमाचे अध्यक्ष ड. भगीरथ शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडले. ते म्हणाले, शासकीय उदासीनतेमुळे बहुजन समाजाच्या शिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जर ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांना सन्मान मिळाला नाही, तर येणारी पिढी संस्कृतीशून्य होईल.

यावेळी मेडीनोवा हॉस्पिटलचे संचालक डॉ.निखिल भामरे, एमव्हीजी ग्रुपचे संचालक शरद देवरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक रवींद्र मालुंजकर यांनी केले, सूत्रसंचालन सविता वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन सन्या हाकड यांनी केले. दत्तात्रय वारे आणि विलास बडे यांनी सत्काराला उत्तर दिले. नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड.नितीन ठाकरे, पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा, तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

पुरस्कारांचे मानकरी
आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे (पुणे), ज्येष्ठ पत्रकार विलास बडे (मुंबई), नाशिक मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश दायमा (लासलगाव), समाजसेवक रतन चौधरी (सुरगाणा), लोकनियुक्त सरपंच वर्षा ठाकरे (धुळे), शैलेंद्र सोनजे (मालेगाव), मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे (दिंडोरी), योगाचार्य प्रज्ञा पाटील (नाशिक), सटाणा मर्चंट बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश सोनाग्रा यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपात गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.


ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...