Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : लंडनमध्ये 'जय महाराष्ट्र'चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून भाषण;...

Eknath Shinde : लंडनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून भाषण; ब्रिटिशांकडून टाळ्या वाजवून दाद

ब्रिटिश संसदेत दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिटनच्या संसदेत आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासकीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना दोन महत्त्वाच्या जागतिक पुरस्कारांनी (Awards) गौरवण्यात आले.त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या इंग्रजीतील भाषणात महाराष्ट्रातील (Maharashtra) लाडकी बहीण योजना ते पायाभूत सुविधां आदी मुद्यांवर भाष्य केले. शिंदे यांच्या भाषणावर सभागृहातील ब्रिटिशांनी देखील टाळ्या वाजवून दाद दिली.

- Advertisement -

यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार.. जय हिंद – जय महाराष्ट्र आणि जय भवानी, जय शिवाजी’या घोषणांनी केली. तसेच सुरेश भटांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…” या कवितेचा उल्लेख करत जागतिक मंचावर मराठी भाषेचा ( Marathi language) अभिमान व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही कोणतीही चॅरिटी नसून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाची आणि स्वावलंबनाची एक ‘गेमचेंजर’ योजना असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पुढे ते म्हणाले, वडिलांच्या (Father) नावांसोबत आईचे (Mother) नाव कायदेशीररीत्या जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. केवळ रस्ते बांधणे म्हणजेच विकास नसून विकास थेट लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ याद्वारे लाखो नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

तसेच मुंबई आणि लंडन (Mumbai and London) ही दोन्ही जगातील प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याला मोठी संधी असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. या ऐतिहासिक सोहळ्याला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, खासदार, विविध देशांचे राजदूत आणि जागतिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेंना मिळालेले बहुमान आणि सन्मान

कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन : ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’तर्फे प्रदान करण्यात आला.

स्टेटस्मनशिप अवॉर्ड : ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये सन्मानित करण्यात आले.

ताज्या बातम्या