मुंबई | Mumbai
अखंड भारताचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ठिकठिकाणी शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे,गाणे लावण्यात आली असून, सकाळपासूनच त्यांना अभिवादन केले जात आहे. किल्ले शिवनेरीवर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपस्थित होत्या. यावेळी शिवभक्तांचा मोठा जल्लोष, पारंपरिक वाद्ये आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “अजितदादांनी ज्या तळमळीने आणि वेगाने काम केले, त्याच कार्यपद्धतीने काम करण्याचे ध्येय मनी बाळगले आहे. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त दादा या कार्यक्रमाला उपस्थित असायचे. शिवनेरीचा जिवंत वारसा जपण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी किल्ल्याच्या (Shevneri Fort) विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. दादांना अपेक्षित विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य करताना कुठेही कसूर बाकी राहणार नाही, याची खबरदारी मी घेईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या की, “यापूर्वी अनेक वेळा मला छत्रपती शिवाजी महाराजाचं दर्शन घेण्याची संधी आली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजितदादांनी अनेकदा भाषण दिलेले आहे, असं बोलताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आल्याचे बघायला मिळाले.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा आजचा भूगोल आणि इतिहास आजच्या सारखा दिसला नसता. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. आज मला सांगताना आनंद वाटतो की, युनेस्कोने १२ किल्यांना वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. अजितदादांच्या इच्छेनुसार महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले आहेत. तसेच २०२३ साली ४०० वी शिवजयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करु, असं त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादांच्या आठवणीने गहिवरले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, “गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत अजितदादा होते. त्यांना सुरूवातीलाच आपण श्रद्धांजली अर्पित केली. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो असे म्हणताच त्यांना गहिवरून आले. तसेच आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. शिवनेरीवर आल्यावर नवी उर्जा, प्रेरणा, बळ मिळते. दिल्लीच्या जेएनयूमदध्ये शिवरायांवर अध्ययन केलं जातं. गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाचे कार्य आपण हाती घेणार आहोत. महाराजांची जन्मभूमी आणि जुन्नर तालुक्याचा विकास करण्याचा आम्ही नियोजन केलं आहे. शिवराय काळाच्या पुढे विचाऱ करणारे स्वराज्याचे निर्माते होते. आदर्श राजा कसा आसावा याचा वस्तु पाठ महाराजांनी आखून दिला. आपलं सरकारही तसंच काम करतं आहे. शिवरायांचा एक एक गुण अंगिकारणं गरजेचं आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.





